क्रीडा शिक्षकांचे असहकार्य
By admin | Published: October 15, 2015 01:13 AM2015-10-15T01:13:16+5:302015-10-15T01:13:16+5:30
शिक्षकांच्या वेतनावरील खर्च कमी करण्यासाठी कला, क्रीडा व कार्यानुभव या विषयांच्या शिक्षकांनाच कात्री लावण्याच्या शासननिर्णयाचा निषेध व्यक्त करण्यासाठी बुधवारी
पुणे : शिक्षकांच्या वेतनावरील खर्च कमी करण्यासाठी कला, क्रीडा व कार्यानुभव या विषयांच्या शिक्षकांनाच कात्री लावण्याच्या शासननिर्णयाचा निषेध व्यक्त करण्यासाठी बुधवारी शारीरिक शिक्षकांनी सणस मैदानावरील शालेय विद्यार्थ्यांच्या स्पर्धांना सहकार्य न करण्याची भूमिका घेतली. त्यामुळे बुधवारी सणस मैदानावर एकही स्पर्धा झाली नाही. विद्यार्थ्यांच्या स्पर्धांना आपला विरोध नसून, स्पर्धा घेण्यासाठी ही यंत्रणा नाही व त्यासाठीही शारीरिक शिक्षकच आवश्यक आहेत, हे दाखवून देण्यासाठी स्पर्धांना असहकार्य केल्याचे मत उपस्थित क्रीडा शिक्षकांनी व्यक्त केले.
जिल्हा क्रीडा परिषद आणि शिक्षण मंडळ पुणे महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारपासून पुणे शहर आंतरशालेय मैदानी स्पर्धांना सुरुवात होणार होती. बुधवारी १४ वर्षांखालील विद्यार्थ्यांच्या मैदानी स्पर्धा होणार होत्या. यासाठी शहरातील विविध शाळांतील शारीरिक शिक्षक, पालक विद्यार्थ्यांना घेऊन आले होते. तब्बल १,५०० विद्यार्थी उपस्थित होते; मात्र शासनाने क्रीडा/शारीरिक शिक्षकांना कमी करण्याविषयी अध्यादेश काढल्याने या शिक्षकांनी स्पर्धांना असहकार्य करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, हा शासननिर्णय बालकांच्या व उद्याच्या भावी पिढीच्या आरोग्य व सुदृढतेच्या दृष्टीने घातक आहे. मुलांच्या नैसर्गिक खेळण्याच्या ऊर्मीलाच डावलले जाणार आहे. अभ्यासाच्या तणावातून खेळाद्वारे मुक्त होता येते; मात्र त्याकडे शासन दुर्लक्ष करीत आहेत.
अध्यादेश काय आहे ?
शासनाच्या अध्यादेशानुसार, राज्यातील सहावी ते आठवीच्या शंभरपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांसाठी आता या विषयांचे शिक्षकच असणार नाहीत, तर मोठ्या शाळांमध्ये या विषयाचे अतिथी शिक्षक नेमण्याचा निर्णय घेतला आहे.
कला, क्रीडा व कार्यानुभव या क्षेत्रांत शहराचे किंवा गावाचे नाव उज्ज्वल केलेल्या व्यक्तींमधून मानधन न स्वीकारणाऱ्या व्यक्तीची निवड करण्यात यावी, अशा शासनाच्या सूचना आहेत. मानधन न घेता काम करणारे शिक्षक मिळाले नाहीत तर मानधन देणार आहे.
या शिक्षकांना प्रतितास ५० रुपये याप्रमाणे मानधन देण्यात येणार आहे. महिन्याचे कमाल मानधन अडीच हजार रुपयांपेक्षा जास्त असू नये, असेही शासनाने म्हटले आहे. शंभरपेक्षा कमी पटसंख्येच्या शाळांना या शिक्षकांसाठीचे मानधन शासकीय तिजोरीतून मिळणार नाही. लोकसहभागातून किंवा सीएसआरच्या माध्यमातून छोट्या शाळांनी मानधनाची सोय करायची आहे.
अतिथी शिक्षकाकडून सातत्य मिळणार का ?
अतिथी शिक्षक हा कोणता तरी खेळाडू असेल. स्वयंसेवा म्हणून तो येणार. त्यात सातत्य असेलच याची काय खात्री? शिवाय, निश्चित केलेला अभ्यासक्रम शिकविण्याची त्यांच्यात क्षमता असेलच याबाबतही कोण ठरवणार? या सगळ्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार. याची भरपाई कशी होईल, असेही मत व्यक्त केले जात होते.
पालकही शिक्षकांच्या बाजूने
स्पर्धा अचानक रद्द झाल्याने सुरुवातीला पालक वैतागले होते. विद्यार्थ्यांना वेठीस धरून हे प्रकार करणे योग्य नाही, असे त्यांचे म्हणणे होते. मात्र, विषयाचे गांभीर्य लक्षात आल्यानंतर त्यांनी क्रीडा शिक्षकांची बाजू समजून पाठिंबा देता येईल का, यासाठी प्रयत्न करण्याचे मत व्यक्त केले.