जगाच्या नकाशावर महाराष्ट्राला घेऊन जाईल क्रीडा विद्यापीठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:09 AM2020-12-26T04:09:46+5:302020-12-26T04:09:46+5:30
सुकृत करंदीकर लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : “जागतिक नकाशावर महाराष्ट्राचे नाव कोरले जाईल या दर्जाचे देेशातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा ...
सुकृत करंदीकर
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “जागतिक नकाशावर महाराष्ट्राचे नाव कोरले जाईल या दर्जाचे देेशातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ आम्ही पुण्यात उभारतो आहोत. या विद्यापीठातून सर्वसामान्य, मध्यमवर्गीय घरातील ‘टँलेंट’ला वाव मिळेल. देेशाच्या क्रीडा विकासात अमूल्य भर टाकणारे हे विद्यापीठ ठरेल. येत्या वर्षभरात या विद्यापीठातले अभ्यासक्रम चालू होतील तर तीन वर्षात पूर्ण क्षमतेने हे विद्यापीठ कार्यरत होईल,” असा विश्वास राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी शुक्रवारी (दि. २५) व्यक्त केला.
आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाच्या विधेयकास मंत्रीमंडळाने मान्यता दिल्यानंतर यासंबंधीचे अधिनियम नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही एकमताने मंजूर करण्यात आले. या पार्श्वभूमीवर केदार यांनी म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात ज्येष्ठ क्रीडापटू, प्रशिक्षक, संघटक आदींची बैठक घेतली. देशातले पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ कसे असावे, या संदर्भात यावेळी ज्येष्ठांनी मते व्यक्त केली. त्यानंतर केदार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राज्याचे क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, क्रीडा सहसंचालक सुहास पाटील, तज्ज्ञ डॉ. जवाहर सुरीशेट्टी आदी यावेळी उपस्थित होते.
प्रश्न : पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ पुण्यातच का?
केदार : बालेवाडीच्या शिवछत्रपती क्रीडा संकुलाच्या १५२ एकर जागेत आंतरराष्ट्रीय पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील विद्यापीठाचे कामकाज सुरु होण्यास अनुकूल स्थिती आहे. पुण्यातील वातावरण क्रीडा क्षेत्रास पोषक आहे, येथे अनेक खेळांचे तज्ज्ञ, प्रशिक्षक उपलब्ध आहेत. क्रीडा संस्कृती विकसित झालेले हे शहर असल्याने पुण्याची निवड विद्यापीठ उभारणीसाठी केली.
प्रश्न : क्रीडा संबंधित एवढ्या संस्था, प्रबोधिनी असताना क्रीडा विद्यापीठ का गरजेचे आहे?
केदार : आंतरराष्ट्रीय दर्जाचा एक खेळाडू तयार करायचा तर त्याच्यामागे आई-वडिलांपासून ते प्रशिक्षक, आहारतज्ज्ञ वगैरें जवळपास १७० ते २०० लोकांचे पाठबळ लागते. यामुळे क्रीडा क्षेत्र ही सामान्य कुटुंबातील तरुण-तरुणींना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळवून देण्याची क्षमता असणारी मोठी ‘इंडस्ट्री’ बनली आहे. क्रीडा क्षेत्रात येणारा प्रत्येकजण आंतरराष्ट्रीय स्तरावर मेडल मिळवू शकत नाही. त्या स्तरापर्यंत पोहोचणाऱ्यांना संबंधित क्षेत्रांमध्ये प्रचंड वाव आहे. हे कुशल मनुष्यबळ या विद्यापीठातून तयार होऊ शकेल.
प्रश्न : आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचा आग्रह का?
केदार : राजीव गांधी यांनी संगणक आणला तेव्हा म्हटले गेले की दहा लोकांचे काम एकच संगणक करेल आणि यामुळे बेकारी होईल. प्रत्यक्षात आयटीच्या माध्यमातून आज कोट्यवधी रुपयांची उलाढाल सुरु झाली आहे. हाच धागा पकडून आंतरराष्ट्रीय विद्यापीठाची मुहूर्तमेढ आपण रोवतो आहोत. आपली स्पर्धा जगाशी असेल. या विद्यापीठाच्या माध्यमातून सामान्य तरुण-तरुणींचे भवितव्य सुरक्षित करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. परदेशातील विद्यापीठे, क्रीडा संस्था यांच्याशी आपले विद्यापीठ जोडले जाणार आहे. अद्ययावत तंत्रज्ञानाचा पुरेपुर वापर आपण करणार आहोत.
चौकट
काय असेल विद्यापीठात?
-केंद्रीय विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी)च्या निकषांवर उभारले जाणार.
-पहिल्या टप्प्यात स्पोर्ट्स सायन्स, स्पोर्ट्स टेक्नॉलॉजी आणि स्पोर्ट्स कोचिंग व ट्रेनिंग हे तीन अभ्यासक्रम
-पाच वर्षांकरीता कुलगुरू, रजिस्ट्रार, त्यांची कार्यालयीन पदे आदी एकूण १३३ पदे पहिल्या वर्षात प्रस्तावित.
-दोन वर्षात ग्रामीण महाराष्ट्रात विद्यापीठाची उपकेंद्रे निर्माण करणार.
चौकट
नफेखोरीचा उद्देशच नाही
“राज्य सरकारचे विद्यापीठ असल्याने नफेखोरीचा विषय नाही. विद्यापीठात खासगीची घुसखोरी होऊ देणार नाही. सर्वसामान्यांना जास्तीत जास्त संधी मिळेल याची काळजी घेऊ. महाराष्ट्रात जास्तीत जास्त प्रशिक्षक, खेळाडू, क्रीडा वैद्यक तज्ज्ञ तयार करुन क्रीडा संस्कृतीच्या माध्यमातून राज्याच्या रोजगार निर्मिती आणि सर्वांगिण विकासाचे उद्दीष्ट ठेवले आहे.”
-सुनील केदार, क्रीडा मंत्री, महाराष्ट्र.