पुण्यात २४ ठिकाणी ११४ खड्ड्यांचे स्पॉट; महापालिका म्हणते, ७० टक्के खड्डे बुजविले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2022 11:48 AM2022-11-01T11:48:00+5:302022-11-01T11:48:11+5:30
वाहतूक पोलिसांनी दिलेल्या २४ ठिकाणांपैकी बहुतांशी भाग हे शहरातील प्रमुख रस्त्यांवरील असून, त्यांना प्राधान्याने दुरुस्त केले जाणार
पुणे : पुण्याच्या विविध भागांत २४ ठिकाणी ११४ खड्ड्यांचे स्पॉट असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी महापालिकेला दिली होती. संपूर्ण पावसाळा गेला तरी वरवरची डागडुजी करणाऱ्या महापालिकेने पोलिसांच्या या पत्राची गंभीर दखल घेत गेल्या दोन दिवसांपासून येथील खड्डे बुजविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
महापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी यांनी गेल्या दोन दिवसांत महापालिकेने पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ११४ ठिकाणांपैकी ७० टक्के भागातील खड्डे बुजविले असल्याची माहिती दिली. दरम्यान, शहरातील प्रमुख ११० रस्त्यांवरील डागडुजीसाठी महापालिका आयुक्तांनी नुकतेच आदेश दिले असून, त्यानुसार प्रारंभी ५५ मुख्य रस्त्यांची कामे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती पथ विभागाकडून देण्यात आली. वाहतूक पोलिसांनी दिलेल्या २४ ठिकाणांपैकी बहुतांशी भाग हे शहरातील प्रमुख रस्त्यांवरील असून, त्यांना प्राधान्याने दुरुस्त केले जाणार आहे.