पत्नीच्या पालन पोषणाची जबाबदारी झटकली, न्यायालयाचा दणका; २५ हजार रुपये पोटगी देण्याचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 06:05 PM2024-06-14T18:05:45+5:302024-06-14T18:06:00+5:30
प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी विक्रांत खंदारे यांनी पत्नीला 25 हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश पतीला दिला....
- नम्रता फडणीस
पुणे : लग्नानंतर मूल होत नाही तसेच जात वेगळी असल्या कारणामुळे पती व त्याचे नातेवाईक यांनी पत्नीचा छळ केला. पती स्वतः: घराबाहेर पडला आणि त्याने गृह कर्जाचे हप्ते जाणीवपूर्वक थांबविले. त्यामुळे बँकेने घर ताब्यात घेण्याकरिता कारवाई चालू केली. अशाप्रकारे पत्नीच्या पालन पोषणाची जबाबदारी झटकणा-या पतीला न्यायालयाने दणका दिला आहे. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी विक्रांत खंदारे यांनी पत्नीला 25 हजार रुपये पोटगी देण्याचा आदेश पतीला दिला. पत्नी राहत असलेल्या घराचे थकलेले बँकेचे हप्ते तसेच पुढील बँकेचे हप्ते भरण्याचे देखील आदेशात नमूद करण्यात आले आहे.
राकेश आणि सुनीता ( नाव बदललेले) यांचे लग्न 2011 मध्ये झाले. मात्र लग्नानंतर मूल होत नाही तसेच जात वेगळी असल्यामुळे पतीसह त्याचे नातेवाईक सुनीताचा छळ करायचे. सुनीता घर सोडून जात नाही म्हणून राकेश स्वतः; घराबाहेर पडला. मात्र त्याने गृह कर्जाचे हप्ते जाणीवपूर्वक थांबविले.बँकेने घर ताब्यात घेण्याकरिता कारवाई चालू केली. तसेच पत्नीच्या पालन पोषणाची जबाबदारी ही पतीने टाळली. त्यामुळे पत्नीने अँड सुरेंद्र आपुणे व अनिता पाटील यांच्यातर्फे न्यायालयात अर्ज दाखल करून पत्नीची परिस्थिती न्यायालयासमोर मांडली. पती यास उत्पन्नाचे साधन असतानाही तो पत्नीला सांभाळत नाही. पत्नीला उत्पन्नाचे कुठलेही साधन नाही. त्याचप्रमाणे बँकेचे हप्ते थकल्या कारणाने बँकेने घर ताब्यात घेतल्यास पत्नीला राहण्याकरिता घर नाही या गोष्टी न्यायालयाने विचारात घेऊन पतीस पत्नीला 25 हजार रुपये इतकी पोटगी देण्याचे आदेश दिले.