SPPU: प्र-कुलगुरू पदासाठी अठराजण उत्सुक; तीन महिन्यांपासून पद रिक्त
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 03:22 PM2023-08-18T15:22:30+5:302023-08-18T15:23:54+5:30
प्र-कुलगुरू निवडीचे सर्व अधिकार कुलगुरूंकडे असतानाही त्यास विलंब का हाेत आहे? असा सवाल शैक्षणिक वर्तुळात उपस्थित केला जात आहे...
पुणे : शैक्षणिक तसेच परीक्षेचे वेळापत्रक सुरळीत करणे, तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धाेरणांची प्रभावी अंमलबजावणीसाठी प्र-कुलगुरूंची नियुक्ती गरजेची आहे. मात्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्र-कुलगुरूचे पद सुमारे तीन महिन्यांपासून रिक्त आहे. या पदासाठी तब्बल १८ जण उत्सुक असल्याची माहिती उघडकीस आले आहे. तसेच प्र-कुलगुरू निवडीचे सर्व अधिकार कुलगुरूंकडे असतानाही त्यास विलंब का हाेत आहे? असा सवाल शैक्षणिक वर्तुळात उपस्थित केला जात आहे.
विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डाॅ. संजीव सोनवणे यांची १९ मे २०२३ राेजी नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती झाल्यापासून प्र- कुलगुरू पद रिक्त आहे. जून महिन्यांत प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांची विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड झाली आणि त्यानंतर एक ते दाेन आठवड्यांनी नव्या प्र- कुलगुरूंची निवड होणे अपेक्षित होते. मात्र, शैक्षणिक कारभाराची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी पार पाडणाऱ्या प्र-कुलगुरूंची अद्यापही निवड झालेली नाही.
राज्य सरकारने विद्यापीठ कायद्यात बदल करून प्र-कुलगुरूंच्या निवडीचा अधिकार कुलगुरू यांच्याकडे दिलेला आहे. विद्यापीठ परिसरातील विभागातील काेणाची निवड होणार की संलग्न महाविद्यालयातील व्यक्ती निवडली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यातील अकृषी विद्यापीठात आणि स्वायत्त महाविद्यालयांमध्ये या शैक्षणिक वर्षापासून राष्ट्रीय शैक्षणिक धाेरणाची अंमलबजावणीला सुरुवात झाली आहे. तसेच पुढील वर्षापासून विद्यापीठांशी संलग्न असलेल्या सर्वच महाविद्यालयांत एनईपी लागू करण्यात येणार असून, त्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्र-कुलगुरू नियुक्ती करणे गरजेचे आहे.