SPPU: ललित केंद्रातील "रामायणा" वरुन केंद्रप्रमुखासह सहा जणांना जामीन
By नम्रता फडणीस | Published: February 3, 2024 08:28 PM2024-02-03T20:28:06+5:302024-02-03T20:29:59+5:30
केंद्रप्रमुख डॉ. प्रवीण भोळे, भावेश पाटील, जय पेडणेकर, प्रथमेश सावंत, ऋषिकेश दळवी, यश चिखले अशी जामीन मंजूर झालेल्यांची नावे आहेत....
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सादर झालेल्या नाटकात रामायणाचा विपर्यास करून हिंदुंच्या भावना दुखावल्या प्रकरणी विद्यापीठाच्या ललित कला केंद्रप्रमुखासह अटक करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस.के.दुगावकर यांनी जामीन मंजूर केला. सरकारी वकिलांनी पोलिस कोठडी देण्याची मागणी न्यायालयाने फेटाळत सहा जणांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर त्यांनी जामिनासाठी अर्ज केला. केंद्रप्रमुख डॉ. प्रवीण भोळे, भावेश पाटील, जय पेडणेकर, प्रथमेश सावंत, ऋषिकेश दळवी, यश चिखले अशी जामीन मंजूर झालेल्यांची नावे आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांकडून शुक्रवारी सायंकाळी रामायणात काम करणाऱ्या कलाकारांच्या आयुष्यावर आधारित ‘जब वी मेट’ या नावाच्या नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले होते. त्यात रामायणाचा विपर्यास केल्याच्या आरोपावरून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) कार्यकर्त्यांनी नाटकाचा प्रयोग बंद पाडला. यावेळी मोठा गोंधळ झाला. त्यानंतर ‘अभाविप’च्या कार्यकर्त्यांनी चतु:श्रुंगी पोलिस ठाण्यात धाव घेतली. ‘अभाविप’चे पुणे महानगर मंत्री हर्षवर्धन सुनील हरपुडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून मध्यरात्रीनंतर गुन्हा दाखल झाल्यानंतर केंद्रप्रमुखासह सहा जणांना अटक करण्यात आली.
शनिवारी (दि. 3) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास सहा जणांना न्यायालयात हजर करण्यात आले. सरकार पक्षातर्फे युक्तिवाद करताना अॅड. विशाल मुरळीकर यांनी आरोपींनी केलेला गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे. याप्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का? तसेच त्यांच्या आणखी काही साथीदारांचा शोध पोलिसांना घ्यायचा आहे, विद्यार्थ्यांनी कोणत्या उददेशाने नाटक सादर केले? त्यांना नाटक लिहिण्यास कुणी सांगितले होते का? असा युक्तिवाद केला. न्यायालयाने सरकारपक्षासह बचावपक्षाचा युक्तिवाद ऐकून घेत सहा जणांना न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यानंतर सहा जणांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज केल्यानंतर त्यांना जामीन मंजूर केला.