SPPU| पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांना ‘कंबाईन पासिंग’साठी दोन्ही परीक्षा देणे बंधनकारक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 06:19 PM2022-07-30T18:19:25+5:302022-07-30T18:20:19+5:30
दोन्ही परीक्षांना विद्यार्थ्यांनी हजर असणे अनिवार्य....
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२१-२२ च्या उन्हाळी सत्राच्या सर्व विद्याशाखांच्या परीक्षांसाठी एकत्रित गुणांकन अर्थात ‘कंबाईन पासिंग’चा निर्णय घेतला आहे. या परीक्षेत लेखी, तोंडी किंवा प्रात्यक्षिक अशा दोन्ही परीक्षांना विद्यार्थ्यांनी हजर असणे अनिवार्य आहे, असे परिपत्रक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने २८ जुलैला काढले आहे.
विद्यापीठाच्या अधिकार मंडळाने हा निर्णय घेतला आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर विशेष बाब म्हणून केवळ शैक्षणिक वर्ष २०२१-२२ साठी कंबाईन पासिंगचा निर्णय घेण्यात आला आहे. या वर्षातील परीक्षेचे शीर्ष म्हणजेच मौखिक, प्रात्यक्षिक, अंतर्गत आणि लेखी परीक्षा, आदी वेगवेगळे न धरता एकत्रितरीत्या ग्राह्य धरून त्याप्रमाणे निकाल घोषित करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
कंबाईन पासिंग बरोबर परीक्षेपैकी कोणत्याही परीक्षेस विद्यार्थी अनुपस्थित राहिल्यास अशा विद्यार्थ्यांना हा निर्णय लागू राहणार नसल्याचेही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. याबाबतचे परिपत्रक क विद्यापीठ संकेतस्थळावर प्रसिद्ध केले आहे.
दरम्यान, याबाबत समाजमाध्यामांवर काही चुकीची माहिती उपलब्ध असून, विद्यार्थ्यांनी त्यावर विश्वास न ठेवता विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर दिलेली माहिती वाचावी, असेही आवाहन विद्यापीठाकडून करण्यात आले आहे.