SPPU: 'झुरळ, अळी नको आम्हाला जेवण द्या' विद्यार्थी आक्रमक, मुख्य इमारतीसमोर आंदोलन
By प्रशांत बिडवे | Published: October 17, 2023 06:30 PM2023-10-17T18:30:38+5:302023-10-17T18:33:54+5:30
विविध विद्यार्थी संघटनांनी एकत्रित येत आंदोलन केले...
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील भोजनगृहातील जेवणाचा दर्जा सुधारावा यासाठी विद्यापीठातील मुख्य इमारतीसमोर मंगळवारी सकाळी विविध विद्यार्थी संघटनांनी एकत्रित येत आंदोलन केले. यावेळी एनएसयुआय, एसएफआय, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस, विद्यापीठ विद्यार्थी कृती समिती, युक्रांद, सम्यक विद्यार्थी आंदोलन, लोकायत आदी संघटनांनी आंदोलनात सहभाग घेतला.
वसतीगृह क्र. ८ मधील मेसमधील जेवणात सोमवारी रात्री पुन्हा झुरळ आढळून आल्याचा प्रकार घडला. यामुळे आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनी मेसमध्येच ठिय्या देत आंदोलन केले. मंगळवारी विद्यार्थ्यांनी आंदोलन केले 'झुरळ, आळी नको, आम्हाला जेवण द्या' , 'निकृष्ट जेवण देणाऱ्या कंत्राटदारांची हकालपट्टी करा, आदी घोषणा देत निषेध व्यक्त केला.
दरम्यान, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी आंदोलनस्थळी येत विद्यारर्थ्यांची भेट घेतली. हॉस्टेल क्र. ८ सह इतर भोजनगृहाचे कंत्राट रद्द करू लवकरच भोजनगृह समिती तसेच दक्षता समिती स्थापन करू असे आश्वासन दिले आणि त्यानंतर आम्ही आंदोलन मागे घेतल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.