SPPU: पुणे विद्यापीठच दहशतीखाली; कसे शिकविणार अन् मुले काय शिकणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2024 09:39 AM2024-02-05T09:39:38+5:302024-02-05T09:40:37+5:30
दरम्यान, ललित कला केंद्राचे विद्यार्थी व विभागप्रमुख यांच्यावर हेतुपुरस्पर दाखल केलेल्या पोलिस तक्रारी विरोधात विद्यापीठाने अधिकृत भूमिका घ्यावी व केसेस काढून घ्याव्यात, अशीही मागणी यावेळी करण्यात आली....
पुणे : ललित कला केंद्रातील ‘जब वी मेट’ नाटकाच्या प्रयोगावरून झालेल्या गोंधळामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे नाव मलिन झाले आहे. विद्यापीठामध्ये झुंडशाहीच्या जोरावर शैक्षणिक स्वायत्ततेवर घाला घातला जात आहे. या हल्ल्यामुळे विद्यापीठात भीतीचे, दहशतीचे वातावरण आहे. अशा वातावरणात प्राध्यापकांनी कसे शिकवायचे अन् विद्यार्थी काय संशोधन करणार, असा सवाल उपस्थित करत या विरोधात योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी विद्यापीठातील प्राध्यापकांच्या सहकारी संघटनेने कुलगुरूंकडे केली आहे.
दरम्यान, ललित कला केंद्राचे विद्यार्थी व विभागप्रमुख यांच्यावर हेतुपुरस्पर दाखल केलेल्या पोलिस तक्रारी विरोधात विद्यापीठाने अधिकृत भूमिका घ्यावी व केसेस काढून घ्याव्यात, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.
विद्यापीठातील ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षेचा भाग म्हणून ‘जब वी मेट’ नाटकांचे शुक्रवारी (दि.२) सादरीकरण सरू होते. हे नाटक प्रहसन प्रकारातील होते. त्यामध्ये कोणाच्याही भावना दुखाव्यात यासाठी ते नाटक नव्हते. खरंतर कोकणातील दशावतारी नाटकास अनुसरून विद्यार्थ्यांच्या नाटकाचे मंथन सुरू होते. परंतु, संपूर्ण नाटक होण्यापूर्वीच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी कलाकारांवर हल्ला करत हा प्रयोग बंद पाडला. तसेच, त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल केले. पोलिसांनी विद्यार्थी व विभागप्रमुखांना अटक केल्याने याविरोधात सर्वच स्तरातून तीव्र पडसाद उमटले. त्या अटकेचा निषेध प्राध्यापक संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.
कॅम्पसमध्ये झुंडशाही अन् गळचेपी
अशा घटनांमुळे विद्यापीठातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांमध्ये भीती, दहशतीचे वातावरण तयार झाले आहे. या वातावरणामध्ये अध्यापन आणि संशोधन करणे कठीण झाले आहे. अभिव्यक्ती व विचार स्वातंत्र्य हे विद्यार्थ्यांच्या, शैक्षणिक संस्थेच्या आणि राष्ट्राच्या विकासासाठी अत्यावश्यक अशी बाब आहे. या स्वातंत्र्यावर विद्यापीठ परिसरात हिंसेचा वापर करून आक्रमण केले जात आहे. या सर्व कारणांमुळे विद्यापीठातील सर्व प्राध्यापकांनी उपाययोजना करण्याची मागणी पत्राद्वारे कुलगुरूंना केली आहे.
प्राध्यापकांचे मुद्दे काय?
- ललित कला केंद्रातील हे प्रकरण विभागात सेवा बजावताना झाले असल्याने विद्यार्थी-प्राध्यापकांच्या न्यायिक प्रक्रियेची संपूर्ण प्रशासकीय आणि आर्थिक जबाबदारी विद्यापीठाने घ्यावी.
- विद्यार्थी व विभागप्रमुख यांच्यावरील पोलिस तक्रारींविरोधात विद्यापीठाने अधिकृत भूमिका घ्यावी व केसेस काढून घ्याव्यात.
- प्रा. प्रवीण भोळे यांच्या सेवा पुस्तिकेवर या प्रकरणाची कोणतीही नोंद केली जाऊ नये.
- ज्या समाज विघातक घटकांनी विद्यापीठ परिसरात हिंसाचार केला आणि शैक्षणिक मूल्यमापनात बाधा आणली त्यांच्यावर विद्यापीठाने कायदेशीर कारवाई करावी.
- अशा घटना पुन्हा होऊ नयेत म्हणून कुलगुरूंनी ठोस पावले उचलावीत. त्यामुळे सर्व घटकांची सुरक्षा अबाधित राहील.
विद्यापीठात सातत्याने गोंधळ
विद्यापीठामध्ये यापूर्वी देखील विद्यार्थी संघटनेने गोंधळ, तोडफोड केली होती. त्यामुळे सातत्याने हा प्रकार विद्यापीठात होत आहे. अशा घटना थांबविणे आवश्यक असून, त्यामुळे विद्यापीठाची बदनामी होत आहे. त्यामुळे अशा विद्यार्थी संघटनांनी तोडफोड न करता लोकशाही पद्धतीने व्यक्त होणे गरजेचे होते, अशी अपेक्षा विद्यापीठातील प्राध्यापक, विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.