SPPU | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून मिळणार साडेसात हजार विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
By प्रशांत बिडवे | Published: April 5, 2023 06:37 PM2023-04-05T18:37:28+5:302023-04-05T18:37:52+5:30
शिष्यवृत्तीची रक्कम बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे...
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने विद्यार्थ्यांना पाच प्रकारच्या शिष्यवृत्ती देण्यात येतात. शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठी ७ हजार ४०२ विद्यार्थ्यांना एकूण ४ कोटी ९५ लाख ६२ हजार रुपयांची शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे. शिष्यवृत्तीची रक्कम बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी अर्थसहाय्य योजना, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना, महात्मा जोतिराव फुले गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना आणि स्वामी विवेकानंद विद्यार्थी सहाय्य योजना या पाच शिष्यवृत्तींसाठी गतवर्षी विद्यापीठातील विभाग आणि संलग्न महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एकूण १४ हजार ८४७ विद्यार्थ्यांचे अर्ज प्राप्त झाले होते. छाननीअंती पदवी अभ्यासक्रमासाठी ४ हजार ७११ व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी २ हजार ६९१ असे एकूण ७ हजार ४०२ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. विद्यापीठाच्या वतीने या विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. शिष्यवृत्तींबाबत नियम, अटीची माहिती विद्यापीठाच्या www.unipune.ac.in या संकेतस्थळावरील ‘विद्यापीठ विविध शिष्यवृत्ती २०२२-२३’ या टॅबवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शिष्यवृत्तींची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा हाेणार
विद्यापीठाची सामाजिक जबाबदारी म्हणून प्रत्येक घटकातील विद्यार्थ्यांस विद्यापीठाच्या वतीने शिष्यवृत्ती देण्यात येतात. दरवर्षी विद्यार्थ्यांकडून अर्ज मागवून घेतले जातात आणि त्यातून पात्र विद्यार्थ्यांची निवड केली जाते. शिष्यवृत्तीची रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होते, अशी माहिती प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी दिली.
इतक्या विद्यार्थ्यांना मिळणार शिष्यवृत्ती
शिष्यवृत्तीचा प्रकार/विद्यार्थी/रक्कम
१. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले अर्थसहाय्य योजना / १४९५ / ७४ लाख ७५ हजार
२. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी अर्थसहाय्य /१४९२ / ४४ लाख ७६ हजार
३. राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना / २१७६ / १ कोटी ८९ लाख ८६ हजार
४. महात्मा जोतिराव फुले गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना / २०९० / १ कोटी ८४ लाख ७६ हजार
५. स्वामी विवेकानंद विद्यार्थी सहाय्य योजना / १४९ / १ लाख ४९ हजार