ठरलं एकदाचं ! विद्यापीठाच्या परीक्षा ११ एप्रिलपासून सुरू होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 05:47 PM2021-03-09T17:47:28+5:302021-03-09T18:15:35+5:30
११ एप्रिलपासुन परीक्षा; सविस्तर वेळापत्रक २५ मार्च रोजी जाहीर
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सुरु असलेल्या परीक्षांच्या घोळावर अखेर पडदा पडला आहे. विद्यापीठाने ११ एप्रिलपासुन परीक्षा सुरु करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. याचे सविस्तर वेळापत्रक २५ मार्च रोजी जाहीर केले जाणार आहे. पुणे विद्यापीठाच्या प्रथम सत्राची परीक्षा मार्च महिन्यात होणार होती. मात्र ॲानलाईन परीक्षा घेणारी कंपनी बदलायची आहे असे कारण देत ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाची बैठक ( बीओई ) आज (दि.9) झाली. त्यात एसपीपीयू एज्युटेक फाऊंडेशन या कंपनीला परीक्षेचे काम देण्याचा निर्णय घेण्यात आला. ही विद्यापीठाची स्वतःची कंपनी आहे. आठ रुपये दराने प्रत्येक विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याबाबत कंपनीने सादर केलेल्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार असून त्यात ५० गुणाचे बहुपर्यायी प्रश्न (एमसीक्यू ) विचारले जाणार आहे,. यापूर्वी निर्णयानुसार २० गुणांचे लेखी स्वरूपातील प्रश्न विचारले जाणार होते. तसेच या प्रश्नांची उत्तरे एका कागदावर लिहून त्या कागदाचा फोटो विद्यापीठाने दिलेल्या संकेत स्थळावर अपलोड करावा लागणार होता. परंतु,विद्यापीठाने २० गुणांची लेखी परीक्षा घेण्याचा निर्णय रद्द केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ ५० गुणांची लेखी परीक्षा द्यावी लागणार आहे.
विद्यापीठाची परीक्षा 15 मार्चपासून घेणार की पुढे ढकलणार याबाबत निर्णय घेतला जाणार असल्यामुळे या बैठकीकडे सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष लागून होते. त्याचप्रमाणे विद्यापीठाच्या कंपनीकडूनच ऑनलाईन परीक्षा घेण्याबाबतचा प्रस्तावाला देखील मंजुरी दिली गेली. तसेच
का झाला परीक्षेला विलंब..?
पुणे विद्यापीठाशी संलग्न तीनही जिल्ह्यातील महाविद्यालयांमधील सुमारे साडेसहा लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा 15 मार्च आणि 30 मार्चपासून सुरू करण्याचा निर्णय विद्यापीठाच्या डिसेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. मात्र, परीक्षेचे काम जुन्याच एजन्सीला देणे नियमाला धरून नसल्याची माहिती समोर आली. त्यामुळे येत्या 15 मार्चपासून विद्यापीठाच्या परीक्षा सुरू करणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाले.परंतु,विद्यापीठाने अद्याप याबाबत कोणताही निर्णय जाहीर केला गेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.