बर्ड फ्लूचा फैलाव राज्यात सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:13 AM2021-01-20T04:13:23+5:302021-01-20T04:13:23+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : यवतमाळ येथील पोल्ट्री फार्ममधील साडेतीन हजार कोंबड्या सोमवारी रात्री अचानक मृत झाल्या. त्यांच्यातील काहींचे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : यवतमाळ येथील पोल्ट्री फार्ममधील साडेतीन हजार कोंबड्या सोमवारी रात्री अचानक मृत झाल्या. त्यांच्यातील काहींचे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. दरम्यान, पोल्ट्री फार्मचालकांनी पोल्ट्रीच्या आसपास ‘डिसइन्फेक्टंट’ या औषधाची फवारणी करावी, असे आवाहन पशू संवधर्न आयुक्तालयाने केले आहे.
यवतमाळ येथील संबंधित पोल्ट्री फार्म धरणाच्या कडेला आहे. धरणावर सध्या स्थलांतरित पक्षी येतात. त्यांच्यातील काहींकडून किंवा कावळ्यांकडून या रोगाची लागण पोल्ट्रीतील कोंबड्यांना झाली असावी, असा अंदाज पशुसंवर्धन विभागाने व्यक्त केला. यानंतर पोल्ट्रीतील अन्य कोंबड्या तसेच १ किलोमीटर परिघातील सर्व पक्षी नष्ट करण्यात येतील, अशी माहिती विभागातर्फे देण्यात आली.
पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डॉ. धनंजय परकाळे यांनी सांगितले की, पोल्ट्री फार्मचालकांनी पोल्ट्रीच्या आसपास डिसइन्फेक्टंट या औषधाची फवारणी करून घ्यावी. बाहेरच्या कोणत्याही स्थलांतरित किंवा पाळीव पक्षी, प्राणी यांचा संपर्क पोल्ट्रीतील कोंबड्यांबरोबर येऊ देऊ नये. राज्यात यवतमाळ वगळता अन्यत्र कुठेही मंगळवारी दिवसभरात कोंबड्या मेल्याचे उदाहरण आढळलेले नाही. यवतमाळ येथील पक्ष्यांच्या नमुन्यांची प्रयोगशाळेत तपासणी झाल्यानंतरच मृत्यूचे निदान होईल.