टोमॅटोवर पाच प्रकारच्या विषाणूंचा फैलाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:08 AM2021-06-11T04:08:08+5:302021-06-11T04:08:08+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क खोडद : जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील टोमॅटो पिकावर आलेल्या १० विषाणूंची तपासणी केली असता, यापैकी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
खोडद : जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील टोमॅटो पिकावर आलेल्या १० विषाणूंची तपासणी केली असता, यापैकी ५ विषाणूंचा या टोमॅटो पिकावर फैलाव झाला आहे. पुण्यातील भारतीय कृषी अनुसंधान संस्थेमध्ये तपासणी केलेल्या विषाणूंपैकी ५ प्रकारच्या विषाणूंचा प्रादुर्भाव झाल्याचे या तपासणीत निष्पन्न झाल्याची माहिती नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख प्रशांत शेटे व पीक संरक्षण विभागाचे प्रमुख डॉ. दत्तात्रय गावडे यांनी दिली.
याविषयी अधिक माहिती देताना कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख प्रशांत शेटे व पीक संरक्षण विभागाचे प्रमुख डॉ. दत्तात्रय गावडे म्हणाले, ३१ मे रोजी रोगग्रस्त टोमॅटोची फळे व झाडे पुणे येथील भारतीय कृषी अनुसंधान संस्थेचे क्षेत्रीय कार्यालयात तपासणीकरिता दिले हातेे. तेथे वेगवेगळ्या १० विषाणूंची चाचणी करण्यात आली. यामध्ये प्रामुख्याने टोमॅटोवर येणारे कुंकबर मोझक व्हायरस (सी.एम.व्ही.), ग्रांऊडनट बड नेक्रॉसीस व्हायरस(जी.बी.एन.व्ही.), कॅप्सिकम क्लोरासिस व्हायरस (सी.ए.सी.व्ही.), टोमॅटो क्लोरॉटिक स्पॉट व्हायरस(टी.सी.एस.व्ही.), टोबॅको मोझॅक व्हायरस (टी.एम.व्ही.), टोमॅटो मोझॅक व्हायरस (टी.वो.एम.व्ही.), पेपर माईल्ड मॉटल व्हायरस (पी.एम.एम.वो.व्ही.), पॉटी व्हायरस ग्रुप, पॉटेटो व्हायरस एक्स (पी. व्ही. एक्स.) आणि टोमॅटो लीफ कर्ल व्हायरस (टी.वो.एल.सी.व्ही.) यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी टोमॅटोच्या फळे, पाने व फांदीमध्ये कुंकबर मोझॅक व्हायरस(सी.एम.व्ही.), ग्राऊंडनेट बड नेक्रॉसिस व्हायरस(जी.बी.एन.व्ही.), कॅप्सिकम क्लोरासिस व्हायरस (सी.ए.सी.व्ही), पॉटी व्हायरस, पोटॅटो व्हायरस एक्स (पी.व्ही.एक्स), या प्रकारच्या रोगांचे विषाणू सापडले आहे.
जुन्नर व आंबेगाव तालुक्यात उन्हाळी हंगामात ३ हजार एकरवर टोमॅटोची लागवड केली गेली आहे. यामध्ये शेतकऱ्यांनी सर्व खासगी कंपन्यांचे वाण शेतकरी घेतले आहेत. मागील १५ दिवसांमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या विषाणूजन्य (व्हायरस) रोगांबद्दल तक्रारी येत होत्या. त्यानुसार कृषी विभागाचे जिल्हा स्तरावरील अधिकारी आणि कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ यांनी संयुक्तिकरित्या जुन्नर तालुक्यातील येडगाव, नारायणगाव, रोहकडी, हिवरे तर्फे नारायणगाव तसेच आंबेगाव तालुक्यातील अवसरी, गावडेवाडी या ठिकाणी भेटी देऊन अनेक टोमॅटोच्या बागांची पाहणी केली होती.
टोमॅटोकडे नगदी पीक म्हणून पाहिले जाते. टोमॅटोला बाजारपेठेत मागणी चांगली असल्यामुळे बाजारभाव देखील चांगला मिळतो. शेतकरी टोमॅटो पिकावर अवलंबून राहून शेतकरी संपूर्ण वर्षाचे आर्थिक नियोजन करतात. टोमॅटो हे हक्काचे आणि खात्रीशीर उत्पन्न मिळवून देणारे पीक म्हणून या पिकाकडे पाहिले जाते. अलीकडच्या काळात टोमॅटोचे उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा वाढता कल आहे, मात्र या वर्षी या व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्याने जुन्नर व आंबेगावमधील शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, पिकासाठी गुंतवणूक केलेले भांडवल देखील शेतकऱ्यांच्या अंगावर आल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.
कोट
या सर्व विषाणूंचा प्रसार प्रामुख्याने मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे रसशोषक किडींमुळे होतो. परिणामी या सर्व विषाणूचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असून रसशोषक किडींचे नियंत्रण करणे गरजेचे आहे. तसेच विषाणूंची साखळी तोडण्यासाठी पिकांची फेरपालट करणे गरजेचे आहे. टोमॅटो बाग स्वच्छ व गवतविरहित ठेवणे गरजेचे असून, शेतकर्यांनी सामूहिक कीड नियंत्रण करणे अपेक्षित आहे.
- डॉ. दत्तात्रय गावडे, प्रमुख, पीक संरक्षण विभाग, कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव
कोट
चालू वर्षी जुन्नर व आंबेगाव तालुक्यात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात टोमॅटोचे पीक घेतले आहे. मात्र, टोमॅटो पिकावर अचानक आलेल्या या व्हायरसमुळे ही टोमॅटो प्लॅस्टिक सारखी दिसत आहेत. त्यामुळे बाजारपेठेत या टोमॅटोला मागणी नाही. कृषी विज्ञान केंद्राच्यावतीने येडगावमधून TO ६२४२ आणि अंसल या जातींचे रोगग्रस्त झाडे व फळे तपासणीसाठी दिली असता त्यामध्ये एकूण पाच प्रकारचे विषाणू (व्हायरस) आढळून आले आहेत.
- प्रशांत शेटे, प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव
फोटो : जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील टोमॅटो पिकावर आलेल्या पाच प्रकारच्या व्हायरसमुळे टोमॅटो प्लॅस्टिकसारखी दिसत आहेत.