''द्वेष छोडो देश जोडो'' म्हणत तरुणांची नागपूर ते पुणे सायकल यात्रा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2019 02:06 PM2019-10-02T14:06:41+5:302019-10-02T15:56:46+5:30
नागपूर ते पुणे सायकल यात्रा काढत तरुणांनी गांधीजींच्या अहिंसेच्या तत्त्वाचा संदेश दिला.
पुणे : महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधून गांधी स्मारक निधीच्या पाच तरुणांनी नागपूर ते पुणे सायकल यात्रा काढत महात्मा गांधी यांच्या अहिंसेचा संदेश दिला. द्वेष छोटो देश जोडो हा या तरुणांच्या सायकल यात्रेचे घोषवाक्य होते. नागपूर येथे सर्वाधिक गुन्हे घडत असल्याने नागपूर पासून या यात्रेला सुरुवात करण्यात आली. पुण्यातील कोथरुड भागातील गांधीभवन येथे या यात्रेचा शेवट करण्यात आला.
अहिंसेच्या जोरावर महात्मा गांधी यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले. स्वच्छता, स्वावलंबन, अहिंसा या तत्त्वांचा गांधीजींना त्यांच्या आयुष्यात अंगीकार केला. आजही महात्मा गांधी करोडो भारतीयांचे प्रेरणास्थान आहे. गांधीजींच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधून राज्यातील विविध भागातील पाच तरुणांनी नागपूर ते पुणे अशी सायकल यात्रा काढली. या पंधरा दिवसाच्या प्रवासामध्ये त्यांनी राज्यातील विविध ठिकाणी थांबत गांधीजींच्या अहिंसा या तत्त्वाचा प्रचार केला. नागपूर मध्ये राज्यातील सर्वाधिक गुन्ह्यांची नोंद झाली असल्याने नागपूरमधूनच या यात्रेची सुरुवात करण्याचा तरुणांनी निर्णय घेतला.
याबाबत बोलताना महेश पाटील म्हणाला, महात्मा गांधींनी आपल्या देशाला अहिंसेचा मार्ग दाखवला. अहिंसेच्या मार्गावर चालत त्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. देश फिरुन त्यांनी भारतीयांना एक केले. सध्या मात्र गांधीजींबाबत गैरसमज पसरवले जात आहेत. दोन धर्मांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. यातून आपल्याला गांधीजींचे विचारच बाहेर काढू शकतील. शांतीला पर्याय नाही शांती हाच मार्ग आहे या विचाराचा प्रसार करत 15 सप्टेंबरला आम्ही या सायकल यात्रेला सुरुवात केली. विविध खेड्यांमध्ये जाऊन आम्ही नागरिकांशी संवाद साधला. गांधींचे विचार नागरिकांपर्यंत पोहचविण्याचा आम्ही प्रयत्न केला. तसेच शाळांमध्ये जाऊन आम्ही प्रबोधन केले, त्याला विद्यार्थ्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिला.