वसंत व्याख्यानमालेला २१ एप्रिलपासून सुरुवात; यंदा व्याख्यानमाला ऑनलाइन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:11 AM2021-04-19T04:11:06+5:302021-04-19T04:11:06+5:30
भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाचे थोर सेनानी लोकमान्य टिळक यांच्या स्मृतिशताब्दीनिमित्त होणारी चार विशेष व्याख्याने, न्यायमूर्ती रानडे यांच्या स्मरणार्थ विशेष व्याख्यान आणि ...
भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाचे थोर सेनानी लोकमान्य टिळक यांच्या स्मृतिशताब्दीनिमित्त होणारी चार विशेष व्याख्याने, न्यायमूर्ती रानडे यांच्या स्मरणार्थ विशेष व्याख्यान आणि बांगलादेश मुक्तीसंग्रामाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त होणारे संरक्षणविषयक व्याख्यान ही यंदाच्या व्याख्यानमालेची वैशिष्ट्ये ठरणार आहेत.
वक्तृत्वोत्तेजक सभेचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक, संस्थेच्या पदाधिकारी आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रभारी कुलगुरु डॉ. गीताली टिळक, प्रमुख कार्यवाह डॉ. मंदार बेडेकर यांनी ही माहिती दिली.
टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या सहकार्याने वसंत व्याख्यानमालेचे यंदाचे सत्र होत असून, ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रा. मिलिंद जोशी, डॉ. उदय कुलकर्णी, प्रकाश जोशी, सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, गौतम बंबवाले, अजित जोशी यांच्या व्याख्यानांची पर्वणी मिळणार आहे.
ज्येष्ठ पत्रकार अरविंद व्यं. गोखले आणि हवाई दलाचे माजी उपप्रमुख एअर मार्शल भूषण गोखले बांगलादेश निर्मितीच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त विशेष व्याख्यान देणार आहेत. अॅड. नितीन आपटे ‘नागरिकत्व सुधारणा कायद्या’वर बोलणार आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. योगेश बेंडाळे ‘कोविड महामारी आणि आयुर्वेद’ या विषयावर व्याख्यान देतील. अॅड. सदानंद फडके, डॉ. आदित्य अभ्यंकर, ज्येष्ठ मधुमेहतज्ज्ञ डॉ. प्रमोद त्रिपाठी, प्रदीप आपटे यांसह विविध वक्त्यांची व्याख्याने होतील. दि. २० मे रोजी व्याख्यानमालेचा समारोप होईल.
टिमवि मास कम्युनिकेशन विभागाच्या यू ट्यूब चॅनेलवर दररोज सायंकाळी पाच वाजता ही व्याख्याने ऐकता येतील.