नृत्याविष्कारातून उलगडले वसंत, ग्रीष्म, वर्षा आणि शिशिर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2019 07:07 PM2019-03-02T19:07:55+5:302019-03-02T19:09:40+5:30
ऋतूंची प्रत्यक्ष अनुभूती आणि त्या ऋतूंप्रमाणेच माणसाच्या मनात सुरु असलेली भावनांची आंदोलने यांचे नितांतसुंदर दर्शन पुणेकरांना घडले. निमित्त होते सिंधू नृत्य महोत्सवात सादर झालेल्या ‘वसंत-ग्रीष्म-वर्षा-शिशिर-वसंत’ या नृत्यप्रस्तुतीचे.
पुणे: ऋतूंची प्रत्यक्ष अनुभूती आणि त्या ऋतूंप्रमाणेच माणसाच्या मनात सुरु असलेली भावनांची आंदोलने यांचे नितांतसुंदर दर्शन पुणेकरांना घडले. निमित्त होते सिंधू नृत्य महोत्सवात सादर झालेल्या ‘वसंत-ग्रीष्म-वर्षा-शिशिर-वसंत’ या नृत्यप्रस्तुतीचे.
सांख्य डान्स क्रिएशन आणि मुद्रा सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या सिंधू नृत्य महोत्सवास शुक्रवारी बालगंधर्व रंगमंदिर येथे उत्साहात सुरूवात झाली. सांख्य डान्स क्रिएशनचे संस्थापक प्रसिद्ध भरतनाट्यम् कलाकार वैभव आरेकर, कथक कलाकार सुशांत जाधव, मुद्रा सेंटर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्सच्या संचालिका पूनम गोखले आदि या वेळी उपस्थित होते. महोत्सवाचे हे सलग पाचवे वर्ष आहे.
ऋतूंवर आधारित ‘वसंत-ग्रीष्म-वर्षा-शिशिर-वसंत’ या नृत्याविष्काराचे दिग्दर्शन वैभव आरेकर यांनी केले असून सुशांत जाधव यांनी हा प्रयोग डिझाईन केला आहे. कसलेल्या नृत्य कलाकारांनी या नृत्यप्रस्तुतीत प्रत्येक ऋतूची वैशिष्ट्ये आणि माणसाच्या भावभावनांचे ऋतू यांचे चित्रण नृत्यातून अत्यंत बारकाईने मांडले. ग्रीष्मातील जाळणा-या वणव्याप्रमाणे होणारी मनाची घुसमट, मोठ्या प्रतीक्षेनंतर पाऊस येतो तेव्हा धरणी जशी सुखावते त्याप्रमाणेच प्रिय व्यक्ती भेटल्यावर मनावर घातली जाणारी फुंकर अशा भावभावना कलाकारांनी अभिनय व पदन्यासातून उलगडून दाखवल्या. सादरीकरणातील सहजता व लालित्याने प्रेक्षकांची उत्स्फूर्त दाद मिळवली.