स्पुटनिक ठरू शकते भारतातील तिसरी लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2021 04:11 AM2021-03-06T04:11:49+5:302021-03-06T04:11:49+5:30

पुणे : सध्या भारतात सिरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळाली आहे. यानंतर स्पुटनिक ...

Sputnik could be the third vaccine in India | स्पुटनिक ठरू शकते भारतातील तिसरी लस

स्पुटनिक ठरू शकते भारतातील तिसरी लस

Next

पुणे : सध्या भारतात सिरम इन्स्टिट्यूटची कोव्हिशिल्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी मिळाली आहे. यानंतर स्पुटनिक लस बाजारात येऊ शकेल, असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवला जात आहे. डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजने रशियातील स्पुटनिक-व्ही लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या भारतात घेतल्या. लसीच्या परिणामकारकतेवर शिक्कामोर्तब झाले आहे. स्पुटनिक लसही २ ते ८ डिग्री सेल्सिअसला साठवली जाऊ शकते. त्यामुळे भारतात लसीकरण प्रक्रियेला वेग येऊ शकतो.

भारतीय औषध प्राधिकरणातर्फे २४ फेब्रुवारी रोजी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजला लसीच्या परिणामकारकतेचे विश्लेषण आणि आकडेवारीबद्दल विचारणा केली. माहितीची पडताळणी करुन लसीच्या आपत्कालीन वापराला परवानगी देण्याबाबत विचार होऊ शकतो, असे वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे. जानेवारी महिन्यात तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्या सुरू असताना दोन्ही लसींना मान्यता देण्यात आली. कोरोनाच्या साथीमुळे आरोग्य आणि अर्थव्यवस्था या दोन पातळ्यांवर सर्वच देशांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा वेळी राष्ट्रीय धोरणांमध्ये काहीशी शिथिलता आणत सर्वच देशांनी परस्पर सहकार्याची भूमिका घेण्याची गरज आहे.

लॅन्सेट जर्नलमध्ये गेल्या महिन्यात स्पुटनिक-व्ही लसींच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांबाबत निष्कर्ष नोंदवले आहेत. सर्व वयोगटांमध्ये लसीची परिणामकारकता आणि सुरक्षितता चांगल्या प्रकारची असल्याचे त्यात म्हटले आहे. रशियातील २०,००० स्वयंसेवकांवरील मानवी चाचणीनंतर लसीची परिणामकारकारकता ९१.६ टक्के असल्याचा निष्कर्ष पुढे आला आहे. डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजशी झालेल्या करारानंतर रशियन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंडतर्फे स्पुटनिक-व्ही लस आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उपलब्ध करुन दिली जाऊ शकते. डॉ. रेड्डीजला १३ कोटी डोस विकण्याची तयारीही रशियाने दर्शवली आहे.

--------------------------------

स्पुटनिक-व्ही लसीला याआधीच दक्षिण आणि उत्तर अमेरिका, युरोप, आफ्रिका, मेक्सिको, इजिप्त यांसह ३५ हून अधिक देशांमध्ये परवानगी मिळाली आहे. स्पुटनिक-व्ही ही लस अ‍ॅडेनोव्हायरल व्हेक्टर्स प्लॅटफॉर्मवर आधारित असून कोरोनावरील पहिली नोंदणीकृत लस ठरली आहे. भारतात लसीकरणाला परवानगी मिळाल्यास साथीचा सामना दुप्पट क्षमतेने करता येऊ शकतो.

- डॉ. अनिकेत हुंजे, मायक्रोबायोलॉजिस्ट

---------------------

स्पुटनिक-व्ही लसीच्या वापराला ३५ हून अधिक देशांनी परवानगी दिली आहे. भारताने ५० हून अधिक देशांना कोव्हिशिल्ड लसीची निर्यात केली आहे. भारतात १३० कोटी लोकांना लस द्यायची आहे. प्रत्येकाला दोन डोस या हिशेबाने २६०-३०० कोटी डोस लागू शकतात. पूर्ण लसीकरण व्हायला दोन वर्षे लागू शकतात. स्पुटनिक-व्हीची जोड मिळाली तर देश या संकटातून लवकरात लवकर सावरु शकतो. रशिया आपला मित्र देश आहे. त्यामुळे भारताला लस सहजपणे उपलब्ध होऊ शकते.

- डॉ. अरविंद देशमुख, मायक्रोबायोलॉजिस्ट सोसायटी, इंडिया

Web Title: Sputnik could be the third vaccine in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.