पासचा गैरवापर रोखण्यासाठी पथक
By admin | Published: September 10, 2016 01:00 AM2016-09-10T01:00:39+5:302016-09-10T01:00:39+5:30
सहा महिने मुदतवाढ दिलेल्या सवलतीच्या दैनिक पासची प्रवासी आणि वाहकांकडून पुनर्विक्री होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली
पुणे : उत्पन्न आणि प्रवासीवाढीच्या दृष्टीने पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) सहा महिने मुदतवाढ दिलेल्या सवलतीच्या दैनिक पासची प्रवासी आणि वाहकांकडून पुनर्विक्री होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. हे प्रकार प्रमुख्याने लांब पल्ल्याच्या मार्गावर अधिक होत असल्याने याला आळा घालण्यासाठी साध्या वेशातील तपासणी पथके नियुक्त करण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला आहे.
या पथकाच्या तपासणीमध्ये असे प्रकार करणाऱ्या व्यक्ती आढळून येताच त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे पीएमपीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. त्यानुसार, पथके तयार करण्यात येत असल्याचेही ते म्हणाले. प्रवासीवाढीसाठी ७० वरून ५० रुपये किंमत करण्यात आलेला हा पास वापरून झाल्यानंतर तो पुन्हा दुसऱ्या प्रवाशाला ३० ते ४० रुपयांना विकण्यात येत असल्याचे प्रकार सासवड, स्वारगेट, हडपसर, निगडी आणि शहरातील इतर प्रमुख स्थानकांवर सर्रास होत असल्याच्या तक्रारी पीएमपीच्या वाहकांनीच वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केलेल्या आहेत.
सार्वजनिक वाहतुकीकडे प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी दैनंदिन सवलतीचा पास ५० रुपयांना देण्यात येत आहे. या पाससाठी कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र घेतले जात नाही. त्यामुळे एक पास किती जण वापरतात, याची कोणतीही माहिती पीएमपीकडे नसते. त्यामुळे काही प्रवासी हे पास स्वस्तात विकत असल्याच्या तक्रारी आहेत. (प्रतिनिधी)
>ओळख निश्चित करणे अवघड
प्रामुख्याने सासवड बस स्थानकावर हा प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. गाडीतून खाली उतरणारे प्रवासी चढणाऱ्या प्रवाशांना हा पास वीस ते तीस रुपयांना देत आहेत. त्यामुळे पासची रक्कम अधिकच कमी होत असल्याने प्रवासीही त्याला प्रतिसाद देत असल्याचे चित्र आहे.
अशा प्रकाराबाबत कारवाई करण्याचा अथवा पासची ओळख निश्चित करण्याकरिता वाहकाला काहीच करता येत नसल्याने हा प्रकार थांबविणे अवघड होत आहे. याची गंभीर दखल घेत पीएमपी प्रशासनाने या प्रकाराला आळा घालण्यासाठी साध्या वेशातील पथक तपासणीसाठी लांबच्या मार्गावर पाठविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
या माध्यमातून असे पास विक्री करणारे आढळल्यास त्यांना तत्काळ ताब्यात घेऊन त्यांना स्थानिक पोलिसांच्या हवाली करण्यात येणार आहे.