'कमलपुष्प' सजावटीमध्ये पुण्यातील श्री महालक्ष्मी देवी विराजमान
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2022 03:55 PM2022-09-26T15:55:47+5:302022-09-26T15:55:56+5:30
श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग तर्फे आयोजन ; धार्मिकतेला सामाजिकतेची जोड देणारा उत्सव
पुणे : श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने आयोजित नवरात्र उत्सवाचा प्रारंभ घटस्थापनेने झाला. कमलपुष्प सजावटीमध्ये श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती, श्री महाकाली देवी विराजमान झाल्या आहेत. अॅड. एस.के. जैन यांनी सपत्नीक घटस्थापनेची पूजा मंदिरामध्ये केली. महालक्ष्मी, महासरस्वती व महाकाली देवीच्या गाभा-यात फुलांची व विविध रंगी मखरांनी आकर्षक सजावट करण्यात आली. भाविकांनी घटस्थापनेच्या दिवशी सकाळपासून महालक्ष्मी देवीचे दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी केली.
घटस्थापनेला पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मंदिराचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अॅड.प्रताप परदेशी, हेमंत अर्नाळकर, भरत अग्रवाल, तृप्ती अग्रवाल, प्रविण चोरबेले आदी उपस्थित होते. यंदा नवरात्र उत्सवानिमित्त कमलपुष्पांची प्रतिकृती मंदिराबाहेर व मंदिरामध्ये साकारण्यात आली आहे. मंदिराच्या परिसरात कमलपुष्पांसह आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आली असून विविधरंगी दिव्यांनी मंदिर उजळून निघाले आहे.
प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल म्हणाल्या, महालक्ष्मी मंदिरात यंदा उत्सवांतर्गत धार्मिकतेला सामाजिकतेची जोड देणारे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. धार्मिक कार्यक्रमांसोबतच देवी जागर नृत्य, महिला पोलीस व महिला पत्रकार सन्मान, परिचारिका गौरव सोहळा, कन्यापूजन, भोंडला, नारी तू नारायणी सन्मान सोहळा, शालेय विद्यार्थी संगीत स्पर्धा, विविध कलाकारांतर्फे गरबा नृत्य असे सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. याशिवाय उत्सवात श्री सुक्त अभिषेक, श्री विष्णु सहस्त्रनाम पाठ, महालक्ष्मी महायाग, महाआरती असे धार्मिक कार्यक्रम देखील मंदिरामध्ये होणार आहेत.
उत्सवात महाराष्ट्रातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मंदिरामध्ये दर्शनासाठी येणार आहेत. भक्तांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने दोन कोटी रुपयांचा विमा काढण्यात आला आहे. मंदिराच्या ५०० मीटर परिघातील सर्व भक्तांना यामुळे विमा संरक्षण मिळणार आहे. तसेच मंदिर व आजूबाजूच्या परिसरात ५० सीसीटिव्ही कॅमेरे आणि २५ हून अधिक सुरक्षारक्षक असणार आहेत. सुरक्षेच्या दृष्टीने सर्व खबरदारी घेण्यात आली असून पुणेकरांनी मोठया संख्येने उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.