श्रीकांत मोघे भूमिकांमधून कायमच चिरंतन राहातील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:13 AM2021-03-16T04:13:10+5:302021-03-16T04:13:10+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : श्रीकांत मोघे म्हणजे उमदे, निगर्वी, चिरतरूण व्यक्तिमत्त्व आणि एक जातीवंत कलावंत. मस्करी, मिश्कीलपणा, लडिवाळपणा, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : श्रीकांत मोघे म्हणजे उमदे, निगर्वी, चिरतरूण व्यक्तिमत्त्व आणि एक जातीवंत कलावंत. मस्करी, मिश्कीलपणा, लडिवाळपणा, सहकाऱ्यांच्या कामाला भरभरून दाद देण्याची वृत्ती ही त्यांची गुणवैशिष्ट्ये होती. ऐतिहासिक नाटकात भूमिका करताना त्यांचा रंगभूमीवरील वावर चित्त्यासारखा असायचा. त्यांच्या रंगमंचावरील प्रवेशाला हमखास शिट्ट्या मिळायच्या. ते आज आपल्यामध्ये नसले तरी भूमिकांमधून कायमच चिरंतन राहातील... अशा शब्दांत ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांनी मोघे यांच्याविषयीच्या आठवणींचा पट उलगडला.
संवाद पुणे आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन यांच्या वतीने दिवंगत ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सोमवारी (दि. १५) श्रद्धांजली सभेचे आयोजन केले होते. त्यावेळी काळे यांनी आठवणींचा पट उपस्थितांसमोर उलगडला. अभिनेते शंतनू मोघे, अभिनेत्री प्रिया मराठे तसेच महापालिका शिक्षण समितीच्या अध्यक्षा मंजुश्री खर्डेकर, संवाद पुणेचे सुनील महाजन, क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर, मराठी चित्रपट महामंडळाच्या संचालिका निकिता मोघे उपस्थित होते.
आशा काळे यांनी त्यांच्या वयाच्या १४व्या वर्षी व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करताना श्रीकांत मोघे यांच्यासमवेत ‘सीमेवरून परत जा’ या नाटकाच्या आठवणींना उजाळा दिला.
’बाबा’ हे अभिनयाचे विद्यापीठ होते असे सांगून अभिनेते शंतनू मोघे म्हणाले, जग किती सुंदर आहे हे त्यांनी पावलोपावली सांगितले. प्रपंच किंवा पेचप्रसंग उदभवला तर त्यातून मार्ग कसा काढायचा, जगायंच कसं? हे बाबांनी शिकविले. आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो याचे भान त्यांनी कायम ठेवले. त्यांच्या निधनाने माझं वैयक्तिक नुकसान झालं आहे.
प्रिया मराठे म्हणाल्या, प्रेम करणे हे बाबांच्या स्वभावातच होते. सून असूनही मुलीसारखे प्रेम त्यांनी माझ्यावर केले. ते नाटकांविषयी, नाट्यप्रयोगांविषयी कायम चर्चा करायचे. घरात येणा-या प्रत्येकाचे ते हसतमुखाने स्वागत करायचे. रवींद्र खरे यांनी परमेश्वरी कृपेला पात्र असणारा माणूस अशा शब्दात भावना व्यक्त केली. उत्स्फूर्तपणे दाद देणारा त्यांच्या सारखा दुसरा कलाकार मिळणार नाही असेही ते म्हणाले.
निकिता मोघे, संजय ठुबे, ज्येष्ठ अभिनेत्री रजनी भट, विजय कोटस्थाने यांनीही मोघे यांच्याविषयीच्या आठवणींना उजाळा दिला. सुनील महाजन यांनी प्रास्ताविक केले. रवींद्र खरे यांनी सूत्रसंचालन केले. संदीप खर्डेकर यांनी आभार मानले.