श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती : कळस उतरविताना कामगार पडला, खासगी रुग्णालयात उपचार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 02:20 AM2017-09-04T02:20:23+5:302017-09-04T02:20:46+5:30
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विराजमान असलेल्या मंडपाचा कळस उतरवित असताना एक कामगार ४० फुटांवरून खाली पडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून गंभीर जखमी झालेल्या कामगारावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती विराजमान असलेल्या मंडपाचा कळस उतरवित असताना एक कामगार ४० फुटांवरून खाली पडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून गंभीर जखमी झालेल्या कामगारावर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली.
राम जाधव (वय २३, रा. नांदेड) असे जखमी कामगाराचे नाव आहे. विश्रामबाग पोलिसांनी याप्रकरणी अपघाताची नोंद केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाने यंदा ब्रह्मणस्पती मंदिराची प्रतिकृती उभारली आहे. या मंडपाच्या बाहेरील भागाचा विसर्जन मिरवणुकीला अडथळा होणार असल्याने बाहेरील बाजूचा भाग हटविण्याचे काम हाती घेण्यात आले होते. शुक्रवारी रात्री या कामाला सुरुवात करण्यात आली होती. मंदिराच्या कळसाचा भाग काढण्यासाठी जाधव वर चढला होता.
त्याच्यासोबत आणखी दोन कामगारही वर होते. तो क्रेनची दोरी कळसाला बांधून खाली येत असतानाच क्रेनचालकाने शिखराचा भाग उचलला. जाधवच्या पायामध्ये दोरी अडकल्यामुळे तो खाली पडला. खाली पडताना देखावा आणि त्यानंतर खाली असलेल्या पत्र्याच्या शेडवर आपटून तो जमिनीवर पडला. थरकुडे क्रेन सर्व्हिस यांच्याकडे जाधव हा काम करतो. कार्यकर्त्यांनी त्याला तत्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. जाधव याच्या डोक्याला व मणक्याला गंभीर मार लागला आहे.