श्रीरंग बारणे, आढळराव पाटील शिंदे गटात; पिंपरीत भाजप आमदारांमध्ये नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 12:32 PM2022-07-22T12:32:36+5:302022-07-22T12:33:02+5:30

शिवसेनेतील बंडखोरांच्या भाजप सलगीने लक्ष्मण जगताप, महेश लांडगे समर्थकांत नाराजी

Srirang Barane Adharao Patil in the Shinde group Discontent among BJP MLAs in Pimpri | श्रीरंग बारणे, आढळराव पाटील शिंदे गटात; पिंपरीत भाजप आमदारांमध्ये नाराजी

श्रीरंग बारणे, आढळराव पाटील शिंदे गटात; पिंपरीत भाजप आमदारांमध्ये नाराजी

Next

पिंपरी : माजी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड करून स्वतंत्र गट स्थापन केला. भाजपशी सलगी करून ते मुख्यमंत्री झाले. त्यानंतर पिंपरी - चिंचवड शहरातील खासदार श्रीरंग बारणे व शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील या दोघांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे. शिंदे गटातील या आजी आणि माजी खासदारांच्या भाजपशी होणाऱ्या नवीन सलगीने भाजपच्या गोटात अस्वस्थता आहे. मावळ व शिरूर लोकसभेसाठी इच्छुक असलेले भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे व माजी मंत्री बाळा भेगडे समर्थकांमध्ये नवीन इनकमिंगने नाराजी पसरली आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेत विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर २० जूनला फूट पडली. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील आमदारांचा मोठा गट बाहेर पडला. त्यांनी भाजपला पाठिंबा देऊन नवीन सरकार स्थापन केले आहे. राष्ट्रपती निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेच्या १२ आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनीही शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे. मावळ व शिरूर या दोन लोकसभा मतदारसंघांचे कार्यक्षेत्र पिंपरी, चिंचवड व भोसरीचे आहे. त्यामुळे या आजी - माजी खासदारांच्या बंडखोरीचे पडसाद पिंपरी - चिंचवडच्या राजकीय समीकरण बदलावर दिसणार आहेत.

भाजपची कोंडी

खरे तर शिवसेना आणि भाजपातील युती फिसकटल्यानंतर मावळ व शिरूर या दोन्ही लोकसभा मतदारसंघांत २०२४साठी भाजपने स्वतंत्रपणे बांधणी सुरू केली होती. शिरूरमधून भाजपचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांनी, तर मावळमधून भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांनी तयारी सुरू केली. याशिवाय मावळमधून बाळा भेगडे व प्रशांत ठाकूर यांच्याही नावाची चर्चा भाजपच्या गोटातून होती. दरम्यान, राज्यातील सत्तांतरानंतर लोकसभा आणि विधानसभेच्या आगामी निवडणुकीत शिंदे गट भाजपसोबत जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या जागा त्यांनाच मिळू शकतात. त्यामुळे खासदारकीसाठी भाजपतील इच्छुक आणि त्यांच्या समर्थकांत अस्वस्थता निर्माण झाली आहे. ही नाराजी आणि बंडखोरांना थोपविण्याचे आव्हान भाजपसमोर असणार आहे.

Web Title: Srirang Barane Adharao Patil in the Shinde group Discontent among BJP MLAs in Pimpri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.