दहावी, बारावीच्या परीक्षेचा ताण आलाय, समुपदेशकांना करा काॅल!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 11:47 AM2023-02-16T11:47:25+5:302023-02-16T11:50:33+5:30
विद्यार्थ्यांनी संपर्क साधून मनमोकळेपणे बोलावे यासाठी माेबाइल क्रमांक देण्यात आले आहेत
पुणे : राज्यात २१ फेब्रुवारी ते २१ मार्च या कालावधीत बारावी तर २ ते २५ मार्च या कालावधीत दहावीचीपरीक्षा हाेणार आहेत. परीक्षेच्या काळात विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भीतीने मानसिक तणावाखाली असतात. या विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी राज्य मंडळाने ऑनलाइन समुपदेशनासाठी समुपदेशकांची नियुक्ती केली आहे. विद्यार्थ्यांनी संपर्क साधून मनमोकळेपणे बोलावे यासाठी माेबाइल क्रमांक देण्यात आले आहेत.
दहावी आणि बारावीच्या परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे समुपदेशन सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार सकाळी आठ ते रात्री आठ या वेळेत संपर्क साधणाऱ्या विद्यार्थ्यांचे समुपदेशकांकडून नि:शुल्क करण्यात येईल, अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.
विद्यार्थ्यांनी ७३८७४००९७०, ८३०८७५५२४१ या क्रमांकांवर सकाळी आठ ते रात्री आठ वेळेत संपर्क साधावा. मात्र, या क्रमांकांवर काॅल करून विद्यार्थी, पालकांनी परीक्षा केंद्र, बैठक व्यवस्था आणि प्रश्नपत्रिका याबाबत विचारणा करू नये, असेही राज्य मंडळाच्या वतीने सांगण्यात आले आहे.