महत्त्वाची बातमी! दहावी-बारावी परीक्षा आता १०० टक्के अभ्यासक्रमावरच
By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 01:20 PM2022-06-18T13:20:25+5:302022-06-18T13:25:01+5:30
शिक्षण विभागाचा निर्णय...
पुणे : या वर्षीच्या २०२२-२३ या शैक्षणिक वर्षाची दहावी-बारावीची परीक्षा ही ७५ ऐवजी १०० टक्के अभ्यासक्रमावर होणार आहे. तसेच परीक्षेसाठी अतिरिक्त कालावधीही दिला जाणार नाही. त्यादृष्टीने विद्यार्थ्यांनी येथून पुढे तयारी करण्याचे आवाहन शालेय शिक्षण विभागाने केले आहे.
राज्यात दोन वर्षे काेरोनाचा प्रादुर्भाव हाेता. दोन वर्षे शाळा सलग सुरू नव्हत्या. मात्र, या काळात विद्यार्थ्यांचे ऑनलाइन पद्धतीने शिक्षण झाले. तरीही विषयाचे पुरेसे आकलन न हाेणे, ऑनलाइन शिक्षणासाठी साधने नसणे अशा विविध समस्यांमुळे ऑनलाइन शिक्षणाला मर्यादा आल्या. त्यामुळे राज्य मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षा ७५ टक्के अभ्यासक्रमांवर घेतल्या. तर प्रात्यक्षिकांसाठी ४० टक्के अभ्यासक्रम होता.
राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून (एससीईआरटी) इयत्ता पहिली ते बारावीचा अभ्यासक्रम २५ टक्क्यांनी कमी केला हाेता. त्यामुळे या इयत्तांच्या परीक्षा उर्वरित ७५ टक्के अभ्यासक्रमांवर झाल्या. दहावी आणि बारावीच्या परीक्षांसोबतच इतर इयत्तांच्या परीक्षा ७५ टक्के अभ्यासक्रमांवर झाल्या. याचा फायदा विद्यार्थ्यांना झाला असून, त्यांचे गुण वाढले आहेत.
मात्र, २०२२-२३ हे शैक्षणिक वर्ष १३ जूनपासून सुरू झाले आहे. त्यामुळे, दहावी-बारावीच्या लेखी परीक्षा या पूर्ण अभ्यासक्रमांवर होणार आहेत. त्याचप्रमाणे प्रात्याक्षिक परीक्षाही १०० टक्के अभ्यासक्रमांवर होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्यादृष्टीने परीक्षेची तयारी करावी, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.
ऑनलाइन शिक्षणामुळे विद्यार्थ्यांचा लिखाणाचा वेग मंदावला होता. त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी मंडळाने परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना विषयानुसार १५ ते ३० मिनिटांचा अतिरिक्त कालावधी दिला होता. मात्र, यापुढे परीक्षेसाठी कोणताही जादा कालावधी राहणार नाही. विद्यार्थ्यांना १०० गुणांच्या परीक्षेसाठी तीन तासांचा कालावधी राहणार आहे.