SSC HSC Exam| विद्यार्थ्यांच्या हॉल तिकिटावर असणार परीक्षेचे वेळापत्रक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 09:28 AM2022-02-10T09:28:17+5:302022-02-10T09:29:29+5:30
गेल्या तीन वर्षांपासून राज्य मंडळाने ही सुविधा सुरू केली आहे
पुणे:महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे राज्यातील ३४ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची दहावी-बारावीची परीक्षा घेतली जात आहे. या परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावर त्यांनी निवडलेल्या विषयांची परीक्षा कोणत्या तारखेला व किती वाजता आहे, याबाबतची माहिती देण्यात आली आहे. गेल्या तीन वर्षांपासून राज्य मंडळाने ही सुविधा सुरू केली आहे. मात्र, मागील वर्षी परीक्षाच न झाल्याने विद्यार्थ्यांना हॉल तिकीट दिले नाही.
राज्य मंडळाकडून पूर्वी हॉल तिकिटांची छपाई केली जात होती. त्यानंतर संबंधित हॉल तिकीट शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाकडे वितरणासाठी सोपवले जात होते; परंतु आता मंडळाकडून कॉलेज आयडीमध्ये विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट आॅनलाइन पाठविले जातात. शाळा, महाविद्यालयांना ते डाऊनलोड करून घेता येत आहे. त्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याचे हॉल तिकीट हरवले तरी त्याला डुप्लिकेट हॉल तिकिटे देणे सोपे झाले आहे. पूर्वी हॉल तिकीट हरवल्यास राज्य मंडळाकडे पत्रव्यवहार करावा लागत होता. त्यात पूर्वी वेळ जात होता.
एका खासगी क्लासने प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकाच्या आधारे काही वर्षांपूर्वी विद्यार्थी परीक्षा केंद्रावर परीक्षा देण्यासाठी गेले होते; परंतु तत्पूर्वीच त्यांचा पेपर होऊन गेला होता. तसेच सोशल मीडियावर फिरणाऱ्या वेळापत्रकामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ होण्याची शक्यता आहे. हॉल तिकिटावर विषयाचा क्रमांक, परीक्षेचा दिनांक आणि वेळ दिल्याने विद्यार्थ्यांचा आता वेळापत्रकाबाबत संभ्रम राहिला नाही.
- महेंद्र गणपुले, प्रवक्ता मुख्याध्यापक संघ
विद्यार्थ्यांना आपण निवडलेल्या विषयाच्या परीक्षेची तारीख व वेळ हॉल तिकिटावर देण्यात आली आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम राहणार नाही. पूर्वी सोशल मीडियावर फिरणाऱ्या वेळापत्रकामुळे गोंधळ निर्माण झाला होता.
- शरद गोसावी, अध्यक्ष, राज्य मंडळ, महाराष्ट्र राज्य