एसटी प्रशासन ५०० गाड्या भाड्याने घेणार, तर ७०० स्वतः तयार करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:10 AM2021-05-17T04:10:16+5:302021-05-17T04:10:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यातील आयुर्मान संपलेल्या अनेक गाड्यांचे रुपांतर मालवाहतुकीत केले जाणार आहे. याच ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यातील आयुर्मान संपलेल्या अनेक गाड्यांचे रुपांतर मालवाहतुकीत केले जाणार आहे. याच वेळी एसटी प्रशासन जवळपास ५०० गाड्या भाडे तत्त्वावर घेणार आहे. तर, ७०० गाड्या स्वतः तयार करणार आहे. यामुळे गाड्यांची कमतरता काही प्रमाणात दूर होण्यास मदत मिळेल.
राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात सध्या जवळपास १६ हजार प्रवासी गाड्या आहे. तर, १३०० माल वाहतूक करणाऱ्या गाड्यांची संख्या आहे. आयुर्मान संपलेल्या अनेक गाड्या या स्क्रॅप केल्या जातील. तर, काही गाड्या माल वाहतुकीसाठी वापरल्या जातील. यामुळे एसटी प्रवासी वाहतूक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गाड्यांची कमतरता जाणवू शकते. त्यामुळे एसटी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
बॉक्स 1
७०० गाड्यांसाठी २०० कोटींचा खर्च
राज्य परिवहन महामंडळाच्या तीन कार्यशाळेत गाड्यांची बॉडी बांधण्याचे काम केले जाते. यात दापोडी, नागपूर व औरंगाबादचा समावेश आहे. या तिन्ही ठिकाणी ७०० गाड्या तयार करण्याचे काम होणार आहे. चासी मिळाल्यानंतर, एका दिवसात तिन्ही ठिकाणी मिळून रोज सरासरी तीन ते चार गाड्या तयार केल्या जातील. यासाठी किमान २०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
बॉक्स 2
७० वर्षांत पहिल्यांदा
राज्य परिवहन महामंडळ पहिल्यांदाच साध्या गाड्या भाडे तत्त्वावर घेणार आहे. यापूर्वी केवळ शिवनेरी, शिवशाही, व्होल्वो आदी गाड्या भाड्याने घेतले. एसटीच्या वाहतूक विभागाने ५०० गाड्या भाड्याने घेण्याबाबतचा प्रस्ताव तयार केला आहे. तो बॉर्डसमोर मांडण्यात येईल. भाड्याने गाड्या घेण्यासाठी तुलनेने कमी खर्च येणार असल्याने या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची दाट शक्यता आहे.
कोट
जवळपास ७०० गाड्या आम्ही स्वतः तयार करणार आहोत. लवकरच याच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात होईल. अंदाजे २०० कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
- शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, राज्य परिवहन महामंडळ, मुंबई