Christmas Days: दगड अन् चुन्याने नटलेले पुण्यातील सेंट अँण्ड्रूज चर्च
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2021 12:15 IST2021-12-23T12:10:26+5:302021-12-23T12:15:28+5:30
खडकी परिसरातील एल्फिस्टन रोडवरील सेंट अँण्ड्रूज चर्च एक ऐतिहासिक वास्तू असून दगड आणि चुनखडीच्या मिश्रणाने ही इमारत बनवली आहे. सॅन १८७९ मध्ये ही वास्तू पूर्ण तयार झाली.

Christmas Days: दगड अन् चुन्याने नटलेले पुण्यातील सेंट अँण्ड्रूज चर्च
तन्मय ठोंबरे
पुणे : खडकी परिसरातील एल्फिस्टन रोडवरील सेंट अँण्ड्रूज चर्च एक ऐतिहासिक वास्तू असून दगड आणि चुनखडीच्या मिश्रणाने ही इमारत बनवली आहे. सॅन १८७९ मध्ये ही वास्तू पूर्ण तयार झाली. ह्या वास्तूचा उपयोग ब्रिटिश लोक प्रार्थना स्थळ म्हणून करीत होते. विशेष करून ब्रिटिश सैनिकांसाठी हे प्रार्थनास्थळ होते. चर्चच्या वास्तू मध्ये अजूनही १८७९ मधील बाकडे आहेत. संपूर्ण खडकावरील ही इमारत गेले १४२ वर्षे दिमाखात उभी आहे. ह्या चर्चच्या चारी बाजूंना दगडी कुंपण आहे. चर्चच्या आवारात प्राचीन वटवृक्ष आहे.
चर्चच्या इमारतीवर एक मनोरमा उभारला आहे. त्या मनोऱ्यावर दोन फूट व्यासाची एक घंटा बसवली आहे. ही घंटा पंच धातूंपासून बनवली आहे. या घंटेचा नाद पूर्ण खडकी परिसरात ऐकू येत असतो. चर्चचे जड, मोठे आणि नक्षीदार दरवाजेदेखील ब्रिटिशकालीन असून चर्चला एक वेगळीच शोभा देतात.
चर्चच्या आतली रचना पण सुभाग आहे. इमारतीचा छप्पर देखील लक्ष वेधून घेते ते वर लावलेल्या सागवानी लाकडांवर. धर्मगुरूंचे पुलपीट देखील आकर्षक आहे. ते सुद्धा सागवानी आणि शिसम लाकडाचे आहे. चर्चमधील ह्या सर्व लाकडी वस्तू ब्रिटिशकालीन आहे. १९७९ च्या चर्चच्या घटनेनुसार मंडळीने निवडून दिलेले अध्यक्ष बन्यामीन गायकवाड यांनी ही सर्व माहिती दिली.
चर्चचे पहिले धर्मगुरू रेवरंट सुमित्र थोरात आणि रेवरंट आर. एस. भारशंकर होते. तर सध्या कार्यरत धर्मगुरू राजेंद्र कटारणवरे आहेत.