Pune: ब्रेक फेल झाल्याने एसटीची सहा वाहनांना धडक; चालकाला घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 09:30 AM2023-11-23T09:30:43+5:302023-11-23T09:31:27+5:30
याप्रकरणी वानवडी पाेलिसांनी एसटी चालक चंद्रशेखर स्वामी (रा. सांगाेला) याला पाेलिसांनी ताब्यात घेतले...
वानवडी (पुणे) : एसटी बसचे ब्रेक निकामी होऊन अपघात झाल्याची घटना मंगळवारी रात्री पुणे सोलापूर रस्त्यावर रामटेकडीजवळ घडली. या अपघातात चार दुचाकी, दोन चारचाकी वाहनांना धडक बसल्याने दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी वानवडी पाेलिसांनी एसटी चालक चंद्रशेखर स्वामी (रा. सांगाेला) याला पाेलिसांनी ताब्यात घेतले.
अपघातात दुचाकी चालक राहुल बोरा (रा. कात्रज) यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून, राजवर्धन वाळुंजकर (वय ८, रा. पुनावळे, पिंपरी चिंचवड) या मुलाच्या डोक्याला मार लागला आहे. मिळालेल्या पोलिस उपनिरीक्षक किरण देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास हडपसरच्या बाजूने स्वारगेटकडे जाणाऱ्या सांगोला-स्वारगेट या एसटी (एमएच १४ बीटी ४६७५) बसचे ब्रेक रामटेकडी येथील पूल पास झाल्यावर अचानक निकामी झाले. त्यामुळे समाेर असलेल्या चारचाकी वाहन या वाहनाला जोरात धडक बसली. त्याचा धक्का पुढील वाहनांना बसला. यामुळे पुढील वाहनांना सुद्धा धडक बसली. बसच्या धडकेने दुचाकी उडून दुभाजकावर गेली. चारचाकी वाहनाला जोरात धडक बसली. पुढे मोठा अनर्थ होऊ नये, या प्रसंगवधनाने एसटी बस चालकाने बस दुभाजकाला धडकवून गाडी थांबवली.
अपघातात दुचाकी व चारचाकीचे वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. कारचालक हरिगोपाल भांगरिया (वय ४०, रा. बिबवेवाडी), काका वाळुंजकर (वय ४०), अश्विनी वाळुंजकर (वय ३०), दुचाकी चालक आशिष कापुरे, कुशल बाळासाहेब गायकवाड, अश्विनी देशमुख (२५, रा. उरळीकांचन) अशी इतर जखमींची नावे आहेत.