Ashadhi Wari: आषाढी वारीत ‘लालपरी’ने कमावले तब्बल १ काेटी; प्रवाशांमध्ये दीडपटीने वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2024 05:13 PM2024-07-29T17:13:47+5:302024-07-29T17:14:32+5:30
एसटीच्या पुणे विभागातील १४ आगारांतून ३०७ जादा बस धावल्या असून २७ हजार भाविकांनी केला प्रवास
पुणे: आषाढी एकादशीला पुणे जिल्ह्यातून वारकरी मोठ्या प्रमाणात पांडुरंगाच्या दर्शनासाठी जातात. यासाठी दरवर्षी एसटी महामंडळाकडून भाविकांची जादा बसची व्यवस्था करण्यात येते. यावर्षीही आषाढी एकादशीच्या पाच दिवस अगोदरपासून पुणे विभागातील १४ आगारांतून जादा बस पंढरपूरला सोडण्याची व्यवस्था एसटी प्रशासनाने केली होती. यंदा वारीत लालपरीला ७६ लाखांचे जादा उत्पन्न मिळाले. तर दीडपटीने प्रवासी संख्येत वाढ झाल्याने प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.
पंढरपूर यात्रेसाठी सोडलेल्या पुणे विभागातील १४ आगारांतून ३०७ जादा बसमधून २७ हजार भाविकांनी प्रवास केला. यातून १ कोटी ८४ लाख ९५ हजार ३४५ रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यंदा अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेतून मोफत प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक होती. गतवर्षीपेक्षा यंदा दीडपट प्रवासी संख्या वाढल्याने माजलगाव आगाराच्या उत्पन्नातही मोठी भर पडली आहे. त्याला वारकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. पुणे विभागाला गेल्या वर्षीपेक्षा चांगले उत्पन्न मिळाले आहे असे एसटी प्रशासनाकडून सांगण्यात आले.
एसटीला ग्रामीण भागातून चांगला प्रतिसाद...
यंदाच्या वारीच्या काळात नारायणगाव, राजगुरुनगर, इंदापूर, बारामती आणि शिरुर या ग्रामीण भागातून पंढरपूरला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. त्यामुळे या पाचही आगार इतर आगारांपेक्षा जादा उत्पन्न मिळविले आहे. नारायणगाव २० लाखांपेक्षा जास्त उत्पन्न मिळवले असून, त्या खालोखाल राजगुरुनगर, इंदापूर, बारामती आणि शिरुर आगार १० लाखांपेक्षा जास्त उत्पन्न मिळवले आहेत.