महत्त्वाची बातमी! लाल परीचा प्रवास महागला, तिकीट दरात 17 टक्क्यांची वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 04:23 PM2021-10-25T16:23:36+5:302021-10-25T16:26:57+5:30
एसटी प्रशासन तोट्यात असण्याचे एक कारण म्हणजे ज्या प्रमाणात डीझेलच्या किंमती वाढल्या होत्या त्याप्रमाणात तिकीट दर वाढले नव्हते
पुणे: मागील काही काळापासून राज्यात पेट्रोल आणि डिझेलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. याचा फटका राज्यातील एसटीला बसत आहे. यामुळे तीन महिन्यांपूर्वी एसटीने राज्य सरकारकडे तिकीट वाढीचा प्रस्ताव पाठवला होता. एसटीच्या या प्रस्तावाला सरकारकडून आता ग्रीन सिग्नल मिळाला आहे. मंगळवारपासून (26 ऑक्टोबर) राज्यभरात एसटीच्या दरात सतरा टक्क्यांची वाढ होणार आहे. ही दरवाढ दिवाळीच्या तोंडावर होत आहे.
गेल्या वर्षभरापासून राज्यातील परिवहन बस तोट्यात होती. कर्मचाऱ्यांच्या पगारीही वेळेवर होत नव्हत्या. एसटी प्रशासन तोट्यात असण्याचे एक कारण म्हणजे ज्या प्रमाणात डीझेलच्या किंमती वाढल्या होत्या त्याप्रमाणात तिकीट दर वाढले नव्हते. यासाठी एसटी प्रशासनाने तीन महिन्यांपूर्वी राज्य सरकारकडे तिकीट दरवाढीचा प्रस्ताव पाठवला होता. त्यामुळे मंगळवारपासून राज्यभरात एसटी तिकिटाचे दर सतरा टक्क्यांनी वाढणार आहेत.