पुणे जिल्ह्यातील एसटी बससेवा सुरू ; शहर, पिंपरी चिंचवडमधील वाहतूक आणखी काही दिवस बंदच
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 03:06 PM2020-05-22T15:06:06+5:302020-05-22T15:11:37+5:30
शुक्रवारपासून बससेवेला हिरवा कंदील मिळाला असला तरी पण प्रवासासाठी काही निर्बंध घालण्यात आले आहेत.
पुणे : लॉकडाऊनमुळे मागील दोन महिन्यांपासून थांबलेली एसटी बसची चाके शुक्रवार (दि. २२) पासून पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात धावू लागली. पुणे व पिंपरी चिंचवडमधील बसची ये-जा मात्र आणखी काही दिवस ठप्पच राहणार आहे. दरम्यान, ग्रामीण भागात बससेवा सुरू झाली असली तरी प्रवासीच नसल्याने बस रिकाम्या धावत होत्या.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत गेल्यानंतर पुण्यातून ये-जा करणाऱ्या एसटी महामंडळाची बससेवा दोन महिन्यांपुर्वी बंद करण्यात आली होती. मागील १५ दिवसांपासून केवळ परराज्यात जाणारे मजुर तसेच परराज्यातून येणाऱ्या महाराष्ट्रातील मजुरांसाठी त्यांच्या जिल्ह्यात सोडण्यासाठी बससेवा सुरू करण्यात आली. काही दिवसांपुर्वी जिल्हांतर्गत बससेवा सुरू करण्याची घोषणा परिवहन मंत्री अनिल परब यांनी केली होती. त्यानुसार दोनच दिवस ही सेवा सुरू राहिली. पण जिल्हांतर्गत बससेवाला विरोध होत असल्याने ती बंद करण्यात आली. आता पुन्हा शुक्रवारपासून बससेवाला हिरवा कंदील मिळाला आहे. पण त्यासाठी काही निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामध्ये ज्येष्ठ नागरीक व लहान मुलांना प्रवेश दिला जाणार नाही. मास्क घालणे बंधनकारक असेल. बसच्या क्षमतेच्या केवळ निम्मेच प्रवासी घेतले जातील आदी अटींचा समावेश आहे. या दक्षता घेऊन पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शुक्रवारी ही बससेवा सुरू झाली आहे.
याविषयी 'लोकमत' ला माहिती देताना एसटीच्या पुणे विभाग वाहतुक नियंत्रक यामिनी जोशी म्हणाल्या, पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील भाग रेड झोनमधे असल्याने येथील स्वारगेट, शिवाजीनगर व पिंपरी चिंचवड आगारातून बससेवा सुरू करण्यात आलेली नाही. तसेच तळेगाव व बारामती एमआयडीसी आगाराची सेवाही बंद राहील. मात्र इंदापुर, बारामती, शिरूर, राजगुरूनगर, सासवड यांसह उर्वरीत आगारांची सेवा सुरू करण्यात आली आहे. सकाळपासूनच बस धावत आहेत. नेहमी गर्दी असलेल्या मार्गांना प्राधान्य दिले जात आहे. त्या मार्गांवरही प्रवासी नाहीत. पण या मार्गावरही प्रवासी नाहीत. त्यामुळे बस रिकाम्या धावत आहेत. पण तरीही काही ठराविक मार्गांवर बस सुरू राहतील.
------------------
पुण्यात ये-जा नाही
पुणे व पिंपरी चिंचवड रेड झोनमध्ये असल्याने दोन्ही शहरांतून एकही बस आगारातून बाहेर पडणार नाही. तसेच जिल्ह्याच्या ग्रामीण भागासह अन्य जिल्ह्यातूनही एकही बस पुणे-पिंपरी चिंचवडमध्ये दाखल होणार नाही. त्यामुळे एसटी बससेवा सुरू झाली असली तरी दोन्ही शहरांतील नागरिकांना त्याचा फायदा मिळणार नाही, हे स्पष्ट आहे.
----------