Pune: आळंदीसह देहूत अत्याधुनिक बसस्थानक होणार, अजित पवारांनी घेतला आढावा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 11:17 AM2023-11-29T11:17:54+5:302023-11-29T11:19:03+5:30

मुंबईत खेड - आळंदी मतदारसंघातील विविध विकासकामांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा बैठक घेतली...

st bus stand will be built in Dehu along with Alandi, Ajit Pawar reviewed | Pune: आळंदीसह देहूत अत्याधुनिक बसस्थानक होणार, अजित पवारांनी घेतला आढावा

Pune: आळंदीसह देहूत अत्याधुनिक बसस्थानक होणार, अजित पवारांनी घेतला आढावा

आळंदी (पुणे) : राज्यातील तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे तीर्थक्षेत्र परिसरात निर्माण होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तीर्थक्षेत्र आळंदीसहदेहू व पंढरपूर परिसरात अत्याधुनिक बसस्थानक बांधून त्याच्यावर रॅम्पची सुविधा असलेले वाहनतळ उभारण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.

मुंबईत खेड - आळंदी मतदारसंघातील विविध विकासकामांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा बैठक घेतली. याप्रसंगी आमदार दिलीप मोहिते-पाटील, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव नितीन करीर, जलसंपदा विभागाचे अपर मुख्य सचिव दीपक कपूर, महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजगोपाल देवरा, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव असिमकुमार गुप्ता, डॉ. के. एच. गोविंदराज, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे, ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, गृह (परिवहन) विभागाचे प्रधान सचिव पराग जैन, सार्वजनिक बांधकाम विभागाचे (रस्ते) सचिव सदाशिव साळुंखे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बिपीन शर्मा, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांच्यासह पाणीपुरवठा विभाग, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, तीर्थक्षेत्र आळंदी येथे आषाढी वारीसह वर्षभर मोठ्या प्रमाणात भाविक येतात. आलेल्या भाविकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये यासाठी पुरेशा वाहनतळाची व्यवस्था उपलब्ध असणे आवश्यक आहे. एसटी बसस्थानकांच्या इमारतीवर रॅम्पच्या सुविधेसह पार्किंग उभारण्याचा प्रस्ताव तयार करावा. या आराखड्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग सुविधेचाही समावेश करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या. बसस्थानक परिसरातील रस्त्यांसाठी एसटी महामंडळाची ६५२ चौरस मीटर जागा प्रस्तावित आहे. त्यासाठी एसटीला जागेच्या मोबदल्याची रक्कम जिल्हा नियोजन समितीमधून देऊन जागा नगरपालिकेला हस्तांतरित करावी, असेही त्यांनी सांगितले.

चाकणच्या हद्दवाढीचा प्रस्ताव सादर करा

चाकण शहरातील विकासकामांचा आढावा घेताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, पुण्याच्या आजूबाजूला असणाऱ्या नगरपरिषद क्षेत्रातील लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे नागरिकांना सोयी-सुविधा देण्यात नगरपरिषदांना मर्यादा येत आहेत. चाकण शहर व परिसराची लोकसंख्याही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे शहराची हद्दवाढ करण्याची मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी दिलीप मोहिते पाटील यांनी केली आहे. नागरिकांना चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी चाकणच्या हद्दवाढीचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

खेड पंचायत समितीची जागा नगरपालिकेला हस्तांतरित करा

राजगुरूनगर येथे हुतात्मा राजगुरू यांचे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यासाठी २४८ कोटी रुपयांचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला आहे. विकास आराखड्याची अंमलबजावणी करताना पोलिस वसाहतीसाठी आरक्षित जागेच्या ठिकाणी नगरपालिकेची प्रशासकीय इमारत करण्याचा सुधारित आराखडा तयार करून प्रस्ताव सादर करावा. त्याचप्रमाणे पंचायत समितीची जुनी जागा आहे, ती जागाही नगरपालिकेला हस्तांतरित करण्याबाबत निर्णय घेण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

नवीन उद्योगांसाठी पाणी राखीव ठेवा

चाकण एमआयडीसीकडे ४२ एमएलडी पाण्याची मागणी होत आहे. परिसरातील सहा ग्रामपंचायतीला एमआयडीसीमार्फत पाणीपुरवठा होत असून, ३० एमएलडी पाणी शिल्लक आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, प्रस्तावित नवीन उद्योगांसाठी पाणी राखीव ठेवून उर्वरित पाण्यामधून गावांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. त्याचप्रमाणे चाकण, राजगुरुनगर आणि आळंदी या तिन्ही नगरपरिषदेचे घनकचरा संकलन प्रकल्प पूर्णतेच्या मार्गावर आहेत.

Web Title: st bus stand will be built in Dehu along with Alandi, Ajit Pawar reviewed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.