औरंगाबाद मार्गावरील एसटी बस बुधवारी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 09:49 PM2018-07-31T21:49:16+5:302018-07-31T21:49:26+5:30
एसटीच्या पुणे विभागातून बुधवारी औरंगाबादला एकही बस सोडण्यात येणार नाही. जून्नर तालुक्यातही बंद असल्याने या भागातही बससेवा बंद राहील.
पुणे : चाकण येथील घटनेने सतर्क झालेल्या एसटी महामंडळाने बुधवारी (दि. १) औरंगाबाद बंदच्या पार्श्वभुमीवर या मार्गावरील सर्व फेऱ्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. एसटीच्या पुणे विभागातून बुधवारी औरंगाबादला एकही बस सोडण्यात येणार नाही. जून्नर तालुक्यातही बंद असल्याने या भागातही बससेवा बंद राहील. दरम्यान, मंगळवारी नाशिक मार्गावरील एसटीची वाहतुक पुर्णपणे ठप्प होती. बुधवारीही परिस्थितीचा अंदाज घेवून बस सोडल्या जाणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी चाकण येथे झालेल्या आंदोलनादरम्यान सोमवारी एसटीचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. एसटीच्या १३ गाड्या जळाल्या असून दोन गाड्यांच्या काचा फोडण्यात आल्या. तसेच नाशिक मार्गावरील सर्व फेऱ्या रद्द करण्यात आल्याने लाखो रुपयांचे उत्पन्नही बुडाले. त्यामुळे एसटी प्रशासनाने कोणताही धोका न पत्करता मंगळावारी चाकण मार्गे नाशिक, भीमाशंकर तसेच शिर्डीला जाणाऱ्या सर्व बसेसच्या फेऱ्या रद्द केल्या. या मार्गावरून दररोज शिवाजीनगर येथून ३३ व नाशिक येथून ३३ तर भीमाशंकरला एकून ३० आणि शिर्डीला पाच फेऱ्या होत्या. नाशिक मार्गाचे दररोजचे उत्पन्न सुमारे ३५ लाख एवढे असते. सोमवारी दुपारपर्यंतच या मार्गावर वाहतुक सुरू राहिल्याने जवळपास निम्म्याहून अधिक महसूल बुडाला आहे.
औरंगाबाद येथे बुधवारी बंद पुकारण्यात आल्याने प्रशासनाने या भागात जाणाऱ्या सर्व फेऱ्या रद्द केल्या आहेत. तसेच जुन्नर तालुक्यातही बंद पुकारण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील बससेवाही बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच ज्याठिकाणी बंद असेल तेथील बससेवा बंद ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, मंगळवारी नाशिक मार्ग वगळता अन्य सर्व मार्गावरील वाहतुक सुरळीतपणे झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
-------------
चाकण येथील घटनेच्या पार्श्वभुमीवर मंगळवारी या मार्गावरील सर्व फेऱ्या रद्द करण्यात आल्या. इतर मार्गावर बससेवा सुरू होती. बुधवारी औरंगाबाद व जुन्नर बंद असल्याने या भागातील सेवा बंद ठेवली जाईल. चाकण येथील घटनेत एसटीच्या नुकसानीचा एसटीच्या अधिकाऱ्यांकडून पंचनामा सुरू आहे.
- यामिनी जोशी, पुणे विभाग नियंत्रक