एसटी बसच्या काचांना जाळ्यांचे कवच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 09:09 PM2018-08-07T21:09:14+5:302018-08-07T21:19:50+5:30
मराठा आंदोलनादरम्यान २० ते २९ जुलै या दहा दिवसांत एसटी महामंडळाच्या ३५३ बसेसची तोडफोड करण्यात आली आहे. त्यामध्ये सोलापुर येथे सर्वाधिक बस फोडण्यात आल्या.
पुणे : राज्यभरात विविध ठिकाणी होणाऱ्या आंदोलनात पहिले लक्ष्य ठरणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसेसला आता लोखंडी जाळ्यांचे कवच मिळणार आहे. महामंडळाकडून यापुवीर्ही काही गाड्यांना समोरच्या बाजुला जाळ्या बसविल्या आहेत. मात्र, मराठा आंदोलनात बसेसच्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर बहुतेक साध्या गाड्यांना अशा बसविण्यात येणार असल्याची माहिती महामंडळातील अधिकाऱ्यांनी दिली.
मराठा आंदोलनादरम्यान २० ते २९ जुलै या दहा दिवसांत एसटी महामंडळाच्या ३५३ बसेसची तोडफोड करण्यात आली आहे. त्यामध्ये सोलापुर येथे सर्वाधिक बस फोडण्यात आल्या. यामध्ये एसटी बसेसचे सुमारे दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. चाकण येथे झालेल्या आंदोलनात दोन साध्या गाड्यांसह शिवशाहीच्याही काचा फोडण्यात आल्या. याआधीच राज्यात अनेकदा ठिकठिकाणी झालेल्या आंदोलनामध्ये एसटी बसेसला लक्ष्य करण्यात आले आहे. काचांची तोडफोड तसेच जाळपोळ करण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. आंदोलनांमध्ये एसटीच्या पुढील भागाच्या काचा फोडल्या जातात. या काचांची किंमत पाच ते दहा हजारांच्या घरात आहे. त्यामुळे याचा एसटीला मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. अनेकवेळा चालत्या बसवर समोरच्या बाजुला दगडफेक केली जाते. त्यामुळे काच फुटून चालकाचे बसवरील नियंत्रण सुटण्याची शक्यता आहे. अशा घटना प्रवाशांच्या जीवावर बेतू शकतात. त्यामुळे एसटी महामंडळाकडून याबाबत आधीपासूनच खबरदारीचा उपाय म्हणून साध्या गाड्यांना समोरच्या बाजुकडील काचांना जाळ्या बसविण्यात आल्या आहेत. मात्र, हे प्रमाण अत्यल्प आहे.
मराठा आंदोलनामध्ये झालेल्या नुकसानीनंतर महामंडळाने आता जास्तीत जास्त गाड्यांना पुढील भागातील काचांवर लोखंडी जाळ्या बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार सर्व विभागांना याबाबत सुचना देण्यात आल्या आहे. या जाळ्या उपलब्ध होतील, त्यानुसार बसविण्यात येणार आहेत. प्रामुख्याने संवेदनशील आगारांना सुरूवातीला प्राधान्य दिले जाणार आहे. ह्यपुणे विभागामध्ये आधीपासूनच काही गाड्यांना जाळ्या आहेत. पण आता त्याचे प्रमाण वाढविण्यात येणार आहे. सध्या बारामती, इंदापुर आगारांतील गाड्यांसाठी जाळ्या देण्यात आल्या आहेत. आणखी जाळ्या मागविण्यात आल्या आहेत. या जाळ्या केवळ साध्या गाड्यांना बसविल्या जातील. शिवशाही, शिवनेरी या गाड्यांना अशा जाळ्या बसविणे शक्य होणार नाही. तसेच प्रामुख्याने आंदोलनाच्या ठिकाणी या गाड्या सोडल्या जात नाहीत, अशी माहिती एसटीच्या पुणे विभागाच्या नियंत्रक यामिनी जोशी यांनी दिली.
-----------