एसटी महामंडळाच्या वसाहतीची दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2017 03:23 AM2017-08-09T03:23:17+5:302017-08-09T03:23:36+5:30

राज्यात सर्वाधिक उत्पन्न देणारा परिवहन विभाग म्हणून पुणे विभागाची ओळख आहे. पुणे विभागाअंतर्गतच बारामती आगार येते. यापूर्वी मागील वर्षीदेखील ‘लोकमत’ने येथील इमारतींच्या दुरवस्थेचे वृत्त प्रसिद्ध केले होते.

 ST corporation colonization | एसटी महामंडळाच्या वसाहतीची दुरवस्था

एसटी महामंडळाच्या वसाहतीची दुरवस्था

Next

रविकिरण सासवडे 
बारामती : राज्यात सर्वाधिक उत्पन्न देणारा परिवहन विभाग म्हणून पुणे विभागाची ओळख आहे. पुणे विभागाअंतर्गतच बारामती आगार येते. यापूर्वी मागील वर्षीदेखील ‘लोकमत’ने येथील इमारतींच्या दुरवस्थेचे वृत्त प्रसिद्ध केले होते; मात्र केवळ विचारपूस करण्यापलीकडे अधिकारीवर्गाने काहीही केले नसल्याचे कर्मचाºयांनी सांगितले. बारामती बसस्थानकाच्या आवारात असणाºया कर्मचारी वसाहतीतील इमारतींची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे.
३५ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या इमारतींची अनेक वर्षांपासून दुरुस्तीच झालेली नाही. राज्यासह अनेक ठिकाणी धोकादायक इमारती कोसळण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. या पार्श्वभूमीवर शासकीय कर्मचारी वसाहतीतील धोकादायक इमारतींचेदेखील सर्वेक्षण होणे गरजेचे आहे. मागील १५ दिवसांपूर्वी येथील एका इमारतीच्या छताचा मोठा भाग मध्यरात्रीच्या सुमारास कोसळला होता. मोठा आवाज झाल्याने इमारतीतील सर्व कुटुंबे इमारत सोडून खाली आले होते. संपूर्ण रात्रच या कुटुंबांनी जागून काढली होती. यानंतर अधिकारीवर्गाने या इमारतींची पाहणी केली; मात्र त्यानंतर अद्यापपर्यंत इमारतीच्या दुरुस्तीसंदर्भात हालचाल झाली नाही. अनेक वेळा येथील विभाग नियंत्रक यांच्याकडे अर्ज करूनदेखील त्याची दखल घेतली जात नाही. मात्र, दर महिन्याला येथे राहणाºया ३२ कुटुंबांकडून घरभाडे व देखभाल खर्चासाठी ७५ हजार रुपये परिवहन विभाग वसूल करते. घरभाडे आणि देखभाल खर्च देऊनदेखील कोणत्याही सुधारणा या ठिकाणी होत नाहीत. इमारतीला तडे गेलेच आहेत. तसेच, अनेक ठिकाणी पिंपळाची झाडे उगवली आहेत. झाडांची मुळे भिंतीतून आरपार घरात आली आहेत. त्यामुळे जराशा धक्क्यानेदेखील या इमारती कोसळण्याची शक्याता आहे. कर्मचारीवर्गाला मिळणारे वेतन कमी आहे. तुटपुंज्या पगारामुळे बाहेर घर भाड्याने घेणे परवडत नाही. परिणामी, आहे त्या स्थितीत या ३२ कुटुंबांना या ठिकाणी राहावे लागत आहे.

कर्मचारीवर्गाच्या तक्रारी आम्ही विभाग नियंत्रकांकडे कळवल्या आहेत. त्याचा सातत्याने पाठपुरावादेखील केला जात आहे.
- सुभाष धुमाळ,
आगारप्रमुख, बारामती


खिडक्या झाकण्यासाठी एसटीच्या पाट्यांचा वापर
 या इमारतीच्या अनेक खिडक्या फुटल्या आहेत. त्यामुळे खिडक्या झाकण्यासाठी एसटी बसला लावण्यात येणाºया गावांच्या नावाच्या पाट्या बसवण्यात आल्या आहेत.

परिसरात वाढले गवत

इमारतीच्या परिसरातदेखील मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. त्यामुळे सापांचा वावर वाढला आहे, तर येथील अनेक दुरुस्तीची व देखभालीची कामे वर्गणी गोळा करून करण्यात येतात, असे येथील कर्मचाºयांनी सांगितले. देखभाल खर्च देऊनदेखील पुन्हा पदरमोड करून आम्हालाच दुरुस्ती करावी लागते. अधिकारीवर्गाकडे तक्रारी केल्या, की त्यांच्याकडून दबाव आणला जातो. त्यामुळे ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार’ येथील कर्मचाºयांना सहन करावा लागत आहे. प्रचंड घाण व दुर्गंधीमुळे विषाणूजन्य आजारांनाही येथील रहिवासी बळी पडत आहेत. अंतर्गत रस्ते, पथदिवे, कचराकुंड्या, स्वच्छतागृहांचे फुटलेले चेंबर, खचलेल्या पाण्याच्या टाक्या अशा अनेक असुविधांमध्ये येथील वसाहत अडकली आहे.
एसटी कामगार वसाहतीलगतच आगार व्यवस्थापकांचे निवासस्थान आहे. आगाराच्या ठिकाणी आगारव्यवस्थापकांनी राहणे बंधनकारक आहे. मात्र, आगार व्यवस्थापक येथे राहत नाहीत. या निवासस्थानाची अवस्थाही दयनीय आहे.
 

Web Title:  ST corporation colonization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.