पुण्यातील कात्रीत सापडलेल्या विद्यार्थ्यांच्या मदतीला धावून आली ‘शिवशाही’ बस
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 10:00 PM2020-03-21T22:00:00+5:302020-03-21T22:00:02+5:30
कोरोनाच्या प्रभावामुळे पुणे व मुंबईतील शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे, तसेच खानावळी व उपहारगृहे बंद करण्यात आलेली आहेत.
पुणे : राज्य परिवहन महामंडळातर्फे नागपूर, यवतमाळ, हिंगोली, नांदेड या शहरांपर्यंत पुण्यातून अतिरिक्त ‘शिवशाही’ बस सोडण्यात येणार असल्याची माहिती अॅड. असीम सरोदे यांनी दिली आहे. विदर्भ, मराठवाड्यातील लाखो विद्यार्थ्यांना या अतिरिक्त बसचा फायदा होऊ शकेल. खासगी बसमार्फत होणाऱ्या आर्थिक शोषणाबाबत सहयोग ट्रस्टच्यावतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.
कोरोनाच्या प्रभावामुळे पुणे व मुंबईतील शाळा, महाविद्यालये, वसतिगृहे, तसेच खानावळी व उपहारगृहे बंद करण्यात आलेली आहेत. स्पर्धा परीक्षा देणारी मुले विविध अभ्यासिकांमध्ये अभ्यास करतात. त्या अभ्यासिका बंद करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शिक्षणासाठी पुण्यात व मुंबईत आलेल्या विद्यार्थ्यांना आपापल्या गावी परत जाण्याशिवाय कोणताही पर्याय उरला नाही. या अडचणींचा गैरफायदा घेण्यासाठी अनेक खासगी कंपन्या सरसावल्याचे चित्र दिसून आले. त्यात खासगी बसचालक यांचा मनमानीपणा सुरू होता. वाटेल ते प्रवासदर आकारले जात होते.
अॅड. असीम सरोदे यांनी हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनाही खासगी बस कंपन्यांकडून होणाºया आर्थिक शोषणाबाबतची माहिती दिली. त्यांनी त्वरित परिवहनमंत्री यांच्याशी संपर्क करून विदर्भ व मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना त्यांच्या गावी परतण्यासाठी जादा बसची व्यवस्था राज्य परिवहन महामंडळाने करावी, अशी विनंती केली. कोरोना आजाराशी एकीकडे लढा सुरू असताना या परिस्थितीचा गैरफायदा घेणाºया खासगी बस कंपन्यांबद्दल खासदार हेमंत पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांच्या मागणीला परिवहनमंत्र्यांनी त्वरित प्रतिसाद दिला.
* पुणे ते नागपूर प्रवासासाठी ४००० ते ४५०० रुपये घेण्यात येत आहेत. पुण्यातून मराठवाडा व विदर्भात जाण्यासाठी प्रचंड आर्थिक भुर्दंड प्रवाशांना सहन करावा लागत आहे. विदर्भ व मराठवाड्यातील विद्यार्थ्यांचे प्रवासी म्हणून होणारे हे आर्थिक शोषण रोखण्यासाठी अॅड. असीम सरोदे यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, परिवहनमंत्री, तसेच विधानसभेच्या उपसभापती नीलम गोºहे यांना माहिती दिली. याचिकेसंदर्भात उच्च न्यायालयाने वेळोवेळी मार्गदर्शक सूचना देऊनही प्रवाशांचे आर्थिक शोषण सुरू असल्याची खंत अॅड. असीम सरोदे यांनी व्यक्त केली.
०००