ST चालक अन् टेम्पो चालकात ओव्हरटेकवरून तुफान हाणामारी; परस्परविरोधी फिर्यादी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2023 09:27 AM2023-09-04T09:27:20+5:302023-09-04T09:27:42+5:30
यानंतर दोघांनी वारजे पोलिस ठाणे गाठत एकमेकांविरोधात फिर्याद दिली...
पुणे : ओव्हरटेक करण्याच्या नादात एसटी चालक आणि टेम्पो चालक यांच्यात वेद भवनसमोरील महामार्गावरच जुंपली. दोघांमध्ये फ्री स्टाइल हाणामारी सुरू झाली. यानंतर दोघांनी वारजे पोलिस ठाणे गाठत एकमेकांविरोधात फिर्याद दिली. एसटी महामंडळाचा चालक सुनील किसन धिडे आणि वाहक समाधान पांडुरंग देवकर (१९, रा. अंबरनाथ, ठाणे), तर रमाकांत राजाराम कदम (३६, रा. गोसावी वस्ती) असे टेम्पो चालकाचे नाव आहे.
याप्रकरणी वाहक समाधान पांडुरंग देवकर यांनी वारजे पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी टेम्पो चालक रमाकांत राजाराम कदम यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीत, बसचालक सुनील धिडे एसटी बस घेऊन जात असताना टेम्पो चालक बसला ओव्हरटेक करून जात होता. त्यावेळी देवकर यांनी कदमकडे रागाने पाहिले, असा गैरसमज करून घेऊन त्याने देवकर यांना लोखंडी स्टीलने डोक्यात मारून जखमी केले. तसेच सरकारी कामात अडथळा आणला, असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रमाकांत कदम यांनी वारजे पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, एसटी बस चालक सुनील किसन धिडे आणि वाहक समाधान पांडुरंग देवकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. कदम आणि त्यांचा कामगार विशाल मोहकर हे ट्रान्सपोर्टचा माल घेऊन जात असताना एसटी चालकाने कदम यांच्या गाडीला कट मारला, म्हणून त्यांनी गाडीला कट का मारला, असे विचारले. यावर एसटी चालकाने त्याच्याकडील लोखंडी टॉमीने कदम यांना मारहाण केली, तर देवकर यांनी हाताने मारहाण केल्याचे म्हटले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक ओलेकर आणि पोलिस हवालदार देशमुख करत आहेत.