स्वारगेट स्थानकात असा घडला प्रकार की सर्वच एसटी कर्मचारी झाले आश्चर्यचकीत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 03:27 PM2020-01-23T15:27:41+5:302020-01-23T15:29:41+5:30
बुधवारची संध्याकाळ स्वारगेट एसटी स्थानकातील एसटी कर्मचारी आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांना सुखावणारी हाेती.
पुणे : बुधवारची संध्याकाळ तशी शांतच हाेती. स्वारगेट एसटी स्थानकामध्ये एसटी बसेस येत जात हाेत्या. रात्री आठच्या सुमारास एक घटना घडली आणि एसटीचे सर्व कर्मचारी आश्चर्यचकीत झाले. ‘पॉझिटिव्ह कट्टा’ या ग्रुपच्यावतीने सर्व एसटी कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करत त्यांचा सत्कार करण्यात आला. अचानक झालेला सत्कार पाहून सर्व कर्मचारी भारावून गेले हाेते.
पाॅझिटिव्ह कट्टा या ग्रुपच्यावतीने एसटी कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.‘तुम्ही डोळ्यात तेल घालून काम करता म्हणून प्रवासात आम्ही निर्धास्त झोपू शकतो. आम्ही तुमच्याप्रती कृतज्ञ आहोत.’ असं सांगून प्रत्येक ड्रायव्हर-कंडक्टरना कानटोपी, संक्रांतीचा तिळगूळ, गुलाबाचं फूल आणि आभाराचं पत्र देण्यात आलं. तसेच प्रवासाला जाणा-यांच्या हातावर छान अत्तर लावण्यात आलं. सुरुवातीला काय सुरु आहे याबाबत एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम हाेता. परंतु जेव्हा त्यांना कार्यक्रमाबाबत कळाल्याने हळूहळू ड्रायव्हर-कंडक्टर्सची संख्या वाढत गेली आणि सुमारे २०० हून अधिक लोक जमले आणि त्या सगळ्यांना पाॅझिटिव्ह कट्टाच्या कार्यकर्त्यांनी हात जोडून कर्मचाऱ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
आपल्या कामाची इतकी मनापासून कुणी दखल घेतंय आणि आपल्या पाठीवर हात ठेवतंय ही भावनाच ड्रायव्हर, कंडक्टर, सफाई कर्मचारी यांच्यासाठी कमालीची सुखावणारी होती.