प्रवाशांशी थेट संपर्क असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच एसटीची मदत, अन्य कर्मचारी वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:09 AM2021-05-24T04:09:59+5:302021-05-24T04:09:59+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : प्रवाशांशी थेट संपर्कात येऊन एसटी कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, अशा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना एसटी महामंडळ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : प्रवाशांशी थेट संपर्कात येऊन एसटी कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, अशा कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना एसटी महामंडळ आर्थिक मदत करीत आहे. पण महामंडळातील अन्य विभागातील कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तर त्यांच्या कुटुंबीयांना मात्र कोणतीही आर्थिक मदत केली जात नाही. एसटीच्या या निकषामुळे अनेक कुटुंबीये मदतीपासून वंचित राहत असल्याने एसटी प्रशासनाने आपल्या निकषात बदल करावा, अशी मागणी होत आहे.
राज्य परिवहन महामंडळाचे आतापर्यंत जवळपास ८५०० कर्मचारी कोरोनाबाधित झाले आहेत. तर यातील २५७ कर्मचारी मृत झालेले आहे. यातील केवळ ११ कर्मचाऱ्यांच्या वारसांना आर्थिक मदत केली आहे. उरलेले कर्मचारी हे महामंडळाच्या निकषात बसत नसल्याने त्यांना मदतीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. हा एक प्रकारे कर्मचाऱ्यांवर अन्याय करणारा असल्याची भावना कर्मचारी व वारसांमध्ये निर्माण होत आहे.
एसटीने काढलेल्या
परिपत्रकात प्रवाशांची प्रत्यक्ष संपर्कात येणारे चालक-वाहक, स्थानकावरील काम करणारे वाहतूक नियंत्रक तसेच सुरक्षारक्षक हे साहाय्य मिळण्यासाठी पात्र ठरतील असे नमूद करण्यात आलेले आहे. खरे तर चालक, वाहक ज्या वेळी कामगिरीवरून आगारात येतात. त्या वेळी वाहकांचा संपर्क रोकड शाखेतील कर्मचाऱ्यांशी येतो, तसेच चालकांचा संपर्क कार्यशाळेतील यांत्रिक कर्मचाऱ्यांची येतो. याशिवाय आगार व्यवस्थापक, चालक व वाहकांची कामगिरी लावणारे पर्यवेक्षक तसेच इतर कर्मचारी यांचा संबंध येतो. त्याचप्रमाणे विभागीय कार्यालय, विभागीय कार्यशाळा,मध्यवर्ती कार्यालय व एसटी महामंडळाची इतर सर्व कार्यालये या ठिकाणीसुद्धा कामगिरीवर येणारे कर्मचारी पर्यवेक्षक अधिकारी बस, रेल्वे व इतर वाहनातून कामगिरीवर येतात. त्यामुळे त्या सर्वांचा हस्ते परहस्ते इतर नागरिकांची संपर्क येतो व त्यामुळे सुद्धा बरेच कर्मचारी व अधिकारी कोरोना बाधित होऊन त्यांचा मृत्यू झालेला आहे. तेव्हा थेट प्रवाशांच्याच संपर्कात येऊन मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांनाच मदत करणे हा निकष बदलणे गरजेचे आहे.
------------------------
बहुतांशी कर्मचाऱ्यांच्या वारसांना कोणताही आर्थिक लाभ मिळाला नाही. त्यांच्या वारसांनासुद्धा अनुकंपा तत्त्वावरील नोकरी मिळालेल्या नाहीत. कर्मचाऱ्यांच्या वारसाला नियम अटी व निकष बदलून एक वेगळा पर्याय म्हणून तत्काळ पात्रतेनुसार नोकऱ्या देण्यात याव्यात.
- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस