एसटी प्रवाशांना सवलती हजार; गाड्यांचा मात्र खडखडाट, बसेस हजार वरून थेट पाचशेवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 15:08 IST2025-01-02T15:07:18+5:302025-01-02T15:08:10+5:30
अनेक मार्गावर बस उशिरा धावत असून, काही मार्गावर बस उपलब्ध नसल्याने फेऱ्या रद्द करण्यात येत आहे

एसटी प्रवाशांना सवलती हजार; गाड्यांचा मात्र खडखडाट, बसेस हजार वरून थेट पाचशेवर
पुणे : राज्य सरकारच्या विविध सवलतींमुळे एसटीला प्रवाशांची संख्या लाखोंनी वाढले आहे. परंतु महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ( एसटी) पुणे विभागातील गाड्यांची संख्या मात्र घटली आहे. कोरोना पूर्वी पुणे विभागत एक हजारपेक्षा जास्त गाड्या होत्या. आता मात्र केवळ ७५० गाड्या धावत आहेत. गेल्या दोन वर्षापासून एसटीच्या ताफ्यात साध्या ( लालपरी) बसेस दाखल झाले नाही. तर दुसरीकडे सवलतीमुळे प्रवासी मात्र वाढत आहे. त्यामुळे अनेक मार्गावर बस उशिरा धावत असून, काही मार्गावर बस उपलब्ध नसल्याने फेऱ्या रद्द करण्यात येत आहे.
पुणे एसटी विभागात गाड्या कमी असल्यामुळे प्रवासी वाहतुकीचे नियोजन करताना एसटी प्रशासनाची कसरत होत आहे. त्यातच उपलब्ध एसटी बसपैकी ५०० पेक्षा जास्त बस या दहा वर्षे वयोमर्यादा ओलांडलेल्या आहेत. त्यामुळे जर्जर आणि खिळखिळ्या झालेल्या बस मार्गावर धावत आहेत. परिणामी बस अर्ध्या वाटेत बंद पडणे आणि नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. महामंडळाकडे आधीच बसची कमतरता आहे. त्यात प्रवाशांना अनेक सवलती देण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचा ओढा एसटीकडे वाढला आहे. परिणामी, नागरिकांना अशा खिळखिळ्या बसमधून प्रवास करण्याची वेळ आली आहे. पुण्यातून राज्यातील सर्व भागांत प्रवासी वाहतूक केली जाते. परंतु गाड्यांची संख्या कमी असल्यामुळे प्रवाशांना एक ते दोन तास वाट पाहावी लागत आहे. तर दुसरीकडे खासगी वाहतूकदरांकडून खुलेआमपणे एसटीचे प्रवासी पळवले जात आहे. त्यामुळे एसटींची संख्या कधी वाढणार असा प्रश्न प्रवासी करत आहेत.
खासगी वाहतूकदारांकडून लूट
सलग सुट्या, गर्दीच्या हंगामात एसटीला प्रचंड गर्दी असते. यावेळी प्रवासी खासगी वाहतुकीला प्राधान्य देतात. याचा गैरफायदा घेउन खासगी वाहतूकदरांकडून अव्वाच्या सव्वा तिकीट दर आकारले जाते. पर्याय नसल्याने नागरिकांना मात्र प्रवास करावा लागतो. शिवाय स्वारगेट आणि शिवाजीनगर बसस्थानकाबाहेरच खासगी गाड्या लावून एसटीचे प्रवासी पळविले जातात. याकडे एसटी प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
पुणे विभागातील महामंडळाच्या बस
- एकूण उपलब्ध बस ८१५
- मार्गावरील बस - ७५०
- खासगी इलेक्ट्रिक बस - ७२
- दैनंदिन प्रवासी संख्या - एक लाख ५० हजार
- दैनंदिन उत्पन्न - एक कोटी १० लाख