एसटीची भाडेवाढ अपरिहार्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 10:16 PM2018-06-02T22:16:03+5:302018-06-02T22:16:03+5:30
डिझेल दरवाढीमुळे कंबरडे मोडू लागलेल्या एसटी महामंडळावर आता वेतनवाढीचा बोजा पडणार असल्याने तिकीट दरवाढीशिवाय पर्याय नाही.
पुणे : डिझेल दरवाढीमुळे कंबरडे मोडू लागलेल्या एसटी महामंडळावर आता वेतनवाढीचा बोजा पडणार असल्याने तिकीट दरवाढीशिवाय पर्याय नसल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. एसटी प्रशासनाने सुमारे ३० टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव दिल्याने एसटी भाड्यात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने लांब पल्ल्याच्या बसचे भाडे जास्त वाढू शकते, असेही अधिकाऱ्यांनी नमुद केले.
एसटीच्या ताफ्यात सर्वच बस डिझेलवर धावतात. त्यामुळे दररोज काही हजार लिटर डिझेल लागते. त्यातच मागील काही दिवसांपासून डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. महिनाभरात डिझेलच्या दरात सुमारे साडे तीन रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे एसटीवर मोठा आर्थिक बोजा पडत आहे. त्यातच परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी शुक्रवारी एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनात ३२ ते ४८ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा फायदा १ लाख ५ हजार ६७९ कर्मचाऱ्यांना होणार आहे. ही वेतनवाढ ४ हजार ८४९ कोटी रुपयांची आहे. त्यामुळे पुढील काळात एसटीला मोठ्या आर्थिक संकटातून जावे लागण्याची शक्यता आहे.
आधीच एसटी तोट्यात चालली आहे. यापार्श्वभुमीवर एसटीवरील आर्थिक भार कमी करण्यासाठी तिकीट दरवाढीशिवाय पर्याय नाही. त्यामुळेच एसटी प्रशासनाने रावते यांच्यासमोर सुमारे ३० टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. सध्याची एसटीची गरज लक्षात घेऊन रावते यांच्याकडूनही भाडेवाढीला हिरवा कंदील मिळू शकतो. ही भाडेवाढ पुर्णपणे मान्य न करता त्यात २ ते ५ टक्क्यांपर्यंत कपात केली जाण्याची शक्यता आहे. भाडेवाढ झाल्यास एसटीवरील आर्थिक बोजा कमी होऊन वेतनवाढ देणे शक्य होईल. भाडेवाढ नाकारल्यास राज्य शासनाच्या खांद्यावर हा खर्च पडणार आहे. सद्यस्थितीत शासनानेच विविध खर्चात कपात करण्याचे धोरण स्वीकारल्याने एसटीचा अतिरिक्त भार घेणार नाही. त्यामुळे भाडेवाढीशिवाय एसटीला पर्याय नसल्याचे एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
-----------
भाडेवाढ झाल्यास लांबपल्याच्या बसेसचे तिकीट दर जास्त होतील. शिवशाही, शिवनेरी या सर्वाधिक पसंतीच्या गाड्यांचे तिकीट दर जास्त वाढतील. सध्या खासगी ट्रव्हल्स कंपन्यांना एसटीच्या तिकीट दराच्या दीड पटीपेक्षा जास्त भाडे घेता येत नाही. त्यामुळे एसटीची भाडेवाढ झाल्यानंतर त्याचा फायदा ट्रॅव्हल कंपन्यांनाही होणार आहे. त्यामुळे त्यांचेही लक्ष या भाडेवाढीकडे लागले आहे.