एसटीची शयन-आसन रातराणी बससेवा मार्गावर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2019 04:38 PM2019-11-20T16:38:09+5:302019-11-20T16:41:56+5:30
या बसचा तिकीट दर हिरकणी बसच्या तिकीट दराएवढाच असणार
पुणे : खासगी बससेवेला टक्कर देण्यासाठी एसटी महामंडळाने आता शयन-आसन रातराणी बससेवा सुरू केली आहे. आठवडाभरात सुमारे ४० बसमार्फत १६ मार्गांवर या बस धावतील. पुण्यातून नागपुर, गणपतीपुळे आणि साक्री या मार्गांवर रातराणी धावेल. या बसचा तिकीट दर हिरकणी बसच्या तिकीट दराएवढाच असणार आहे.
एसटी महामंडळाकडून सध्या राज्यभरात २५६ मार्गांवर ५१२ बसद्वारे रातराणी सेवा दिली जाते. पहिल्या रातराणी बस सेवेचा प्रारंभ दि. २० एप्रिल १९६८ रोजी जळगांव - पुणे या मार्गावर करण्यात आला. पण लांब पल्ल्याच्या रात्रीच्या प्रवासासाठी प्रवाशांकडून शयनयान सुविधा असलेल्या खासगी बसला प्राधान्य दिले जाते. त्यामुळे आता एसटीने विना वातानुकूलित शयन-आसन सुविधा असलेल्या बस ताफ्यात आणल्या आहेत. नवीन बसचे लोकार्पण मुंबईतील परळ बसस्थानकात महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. परेल-भटवाडी (पाटगांव ) या मार्गावर पहिली बस धावली.
सध्यस्थितीला साध्या, जलद, रातराणी, हिरकणी, वातानुकूलित शिवशाही, शिवनेरी, अश्वमेध अशा विविध बस सेवेद्वारे दररोज सरासरी ६७ लाख प्रवाशांना नियमित व सुरक्षित प्रवासी दळणवळण सेवा एसटी महामंडळामार्फत पुरविली जाते. आता त्यामध्ये शयन-आसन बसची भर पडली आहे. या बसमध्ये ३० पुश बॅक आसने व १५ प्रशस्त शयन (बर्थ) असलेली सुविधा आहे. तसेच स्वयंचलित दरवाजे, मोबाईल चार्जिंग सुविधा, एसईटी फलक, प्रशस्त खिडक्या आदी सुविधा देण्यात आल्या आहेत. सध्या एकुण २०० बसची बांधणी महामंडळाकडून केली जात असून पहिल्या टप्यात त्यापैकी ४० बस आठवडाभरात मार्गावर येतील. पुण्यासह परेल, मुंबई सेंट्रल, बोरीवली, ठाणे, कोल्हापुर, अमरावती, औरंगाबाद या ठिकाणांहून ठराविक मार्गांवर बस सुटतील. टप्याटप्याने उर्वरीत बस आल्यानंतर मार्ग वाढविण्यात येतील, असे एसटी अधिकाºयांकडून सांगण्यात आले.
--------------
शयनयान रातराणीचे पुण्यातील मार्ग
मार्ग भाडे
पुणे ते नागपुर १२५५ रुपये
पुणे ते गणपतीपुळे ५९५ रुपये
पुणे ते साक्री ६२५ रुपये
............
आरामदायी शयन-आसन बसची वैशिष्ट्ये
- बसमध्ये ३० पुश बॅक आसने व १५ प्रशस्त शयन (बर्थ)
- एलईडी मार्गफलक
- चालक कक्षात अनाऊन्सिंग सिस्टीम
- प्रत्येक बर्थमध्ये मोबाईल चार्जिंगसाठी सुविधा
- प्रत्येक बर्थमध्ये वाचनासाठी रिडींग लॅम्प व निळ्या रंगाची नाईट लॅम्प
- प्रत्येक शयन कक्षाला एक कोच फॅन
-दोन मोठ्या आकाराचे सामान कक्ष
-खिडक्यांचा आकार १९०० मिलीमीटर