पुणे शहराच्या हद्दीबाहेरून एसटी सुरू ; आठवडाभर ५० बसमार्फत प्रायोगिक तत्वावर ही बससेवा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 04:44 PM2020-06-16T16:44:17+5:302020-06-16T16:48:08+5:30
शहराच्या हद्दीत येण्यार परवानगी नसल्याने हद्दीबाहेरून हडपसर व वाघोली येथून बस सुरू
पुणे : पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका हद्द वगळून जिल्ह्यात काही प्रमुख मार्गांवर सोमवार (एसटी)पासून एसटी बससेवा सुरू करण्यात आली आहे. प्रवाशांचा प्रतिसाद कमी असल्याने पुढील आठवडाभर ५० बसमार्फत प्रायोगिक तत्वावर ही बससेवा सुरू राहील. त्यानंतर प्रवाशांच्या प्रतिसादानुसार बस व मार्ग वाढविण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असलेल्या भागात एसटी महामंडळाची बससेवा मागील काही दिवसांपासून सुरू आहे. जिल्ह्याच्या हद्दीपासून बस सोडण्यात येत नाही. पुणे शहर रेड झोनमध्ये असल्याने सुरूवातीला केवळ ग्रामीण भागात बस सुरू करण्यात आल्या होत्या. पण ग्रामीण भागातही संसर्ग वाढू लागल्याने ही सेवाही काही दिवस बंद करण्यात आली होती. आता पुन्हा सोमवार (दि. १५) पासून या भागात ही सेवा सुरू झाली आहे. सध्या केवळ काही ठराविक मार्गांवर ५० बसमार्फत ही सेवा सुरू करण्यात आली आहे. औद्योगिक क्षेत्र तसेच जिल्ह्यातील महत्वाच्या ठिकाणांसाठी प्रामुख्याने ही सेवा असेल. तसेच पुण्यात शासकीय व खासगी नोकरीनिमित्त येणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यामुळे हडपसर व वाघोलीपर्यंत बस उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवारी प्रत्येक बसला दिवसभरात अल्प प्रतिसाद मिळाला. त्यामुळे पुढील आठवडाभर प्रायोगिक तत्वावर ही सेवा सुरू राहील. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून मार्ग वाढविणे किंवा कमी करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
---------------
बस प्रवासासाठी दक्षता
- सुरक्षित अंतरासाठी केवळ २० प्रवाशांना प्रवेश
- ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांना प्रवेश नाही
- प्रत्येक बसमध्ये सॅनिटायझर
- बस प्रवासासाठी मास्क बंधनकारक
---------------
एसटीचे काही मार्ग -
- हडपसर ते बारामती
- वाघोली ते शिरूर
- चाकण ते आळेफाटा
- इंदापुर ते बारामती
- सासवड ते कापुरहोळ
- राजगुरूनगर ते भिमाशंकर
----------------------
शहराच्या हद्दीत येण्यार परवानगी नसल्याने हद्दीबाहेरून हडपसर व वाघोली येथून बस सुरू करण्यात आल्या आहेत. सध्या ५० बस मार्गावर असून टप्प्याटप्याने प्रवाशांचा प्रतिसाद पाहून बस वाढविल्या जातील. पुढील आठवडाभर याबाबत चाचपणी केली जाईल. बसमध्ये सर्व दक्षता घेतल्या जात आहेत.
- यामिनी जोशी, वाहतुक नियंत्रक, पुणे विभाग
----------------------