ST Strike | एसटीचे विलीनीकरण तर नाहीच, पाच महिन्यांचा पगारही गेला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2022 01:06 PM2022-04-09T13:06:48+5:302022-04-09T13:09:11+5:30
संपात सहभागी असल्याने पाच महिन्यांचा पगार नाही...
पुणे : गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने एसटी कर्मचाऱ्यांना २२ एप्रिलपर्यंत कामांवर हजर होण्याचे आदेश दिले. हा निर्णय देताना विलीनीकरणाची मागणी अमान्य करत हा राज्य सरकारचा धोरणात्मक निर्णय असल्याचे सांगितले. विलीनीकरण होणार नाही, संपात सहभागी असल्याने पाच महिन्यांचा पगार नाही. त्यामुळे संपात सहभागी असलेले पुण्यातील बहुतांश कर्मचारी आता कामांवर परतण्याच्या मानसिकतेत आहेत. शिवाय संपात सहभागी घेतलेल्या अनेक कर्मचाऱ्यांनी आधीच एसटीचे स्टेअरिंग हाती घेतले आहे.
संपात सहभाग घेतलेल्या जवळपास ४५१ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले होते. त्यांच्यावर कारवाई न करता त्यांना कामावर परत घ्यावे, असे आदेश महामंडळाला देण्यात आले आहे. त्यामुळे पुणे विभागाच्या ४५१ कर्मचाऱ्यांचा पुन्हा कामावर परतण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. लवकरच हे कर्मचारी कामावर परततील; तर काही कर्मचारी आंदोलन सुरू ठेवण्याबाबत ॲड. गुणरत्न सदावर्ते हे जी भूमिका घेतील, त्या भूमिकेला आमचा पाठिंबा असेल, असे सांगितले. मात्र आधी आंदोलनाच्या अग्रभागी असणारे सर्वजण आता कामावर परतले आहेत. त्यामुळे येत्या एक ते दोन दिवसांत अनेक कर्मचारी कामावर परततील.