एसटी प्रवासी ताटकळत!

By admin | Published: April 25, 2016 02:22 AM2016-04-25T02:22:41+5:302016-04-25T02:22:41+5:30

गाड्या कधीच वेळेवर सुटत नाहीत. अपुऱ्या व खराब गाड्या असल्याने वेळेवर पोहोचत नाहीत. अनेक गावांना बऱ्याचदा गाड्याच जात नाहीत. त्यामुळे प्रवाशांना ताटकळत बसावे लागते.

ST traveler! | एसटी प्रवासी ताटकळत!

एसटी प्रवासी ताटकळत!

Next


भोर : गाड्या कधीच वेळेवर सुटत नाहीत. अपुऱ्या व खराब गाड्या असल्याने वेळेवर पोहोचत नाहीत. अनेक गावांना बऱ्याचदा गाड्याच जात नाहीत. त्यामुळे प्रवाशांना ताटकळत बसावे लागते. अपुरे कर्मचारी, सोयीसुविधांचा अभाव, प्रशासन व संघटनेत समन्वयाचा अभाव यामुळे अवैध वाहतुकीत वाढ होऊन भोर आगाराची एसटी सेवा कोलमडली आहे.
मागील महिनाभरापासून भोर एसटी आगाराकडून गाड्या वेळेवर सुटत नसल्याने वेळेवर पोहोचत नाहीत. पास देण्यासाठी विलंब होतो. कापूरव्होळ ते चेलाडीसह (नसरापूर) इतरत्र थांबणाऱ्या गाड्या कधीच वेळेवर येत नाहीत. विनावाहक गाडीत बसल्यावर तिकीट काढले जात नाही. त्यामुळेही गाड्या उशिराने धावत असल्याने गाड्यांचा काहीच फायदा होत नाही. भोरवरून जाणारी गाडी स्वारगेटला सातारा रोडने जाण्याऐवजी मार्केट यार्डाकडून जात असल्याने प्रवाशांचा वेळ व पैसा अधिक जात होता. याबाबत तक्रारी करूनही सुधारणा होत नसल्याने प्रवासी संघटनेने १९ फेब्रुवारीला एसटी गाड्या रोखून धरल्या होत्या. त्या वेळी प्रशासनाला जाग आली आणि विविध मागण्यांबाबतची आश्वासने देऊन आंदोलन थांबवले. मात्र, प्रवाशांच्या सुखसोयीकडे दुर्लक्ष झाल्यास पुन्हा आंदोलन होऊ शकते.
अगोदरच लांबच्या फेऱ्या कमी, दुर्गम डोंगरी गावांमुळे अंतर अधिक व ग्रामीण भागात प्रवाशांची कमी संख्या त्याचबरोबर महामार्गावर महिन्याला टोलसाठी लागणारे १० ते ११ लाख रुपये यामुळे भोर एसटी आगाराला दिवसाला सुमारे ४० हजारांचा, तर महिन्याला १२ लाख ८ हजारांचा तोटा सहन करावा लागतो. प्रशासन व एसटी संघटना यांच्यात समन्वय राहिला नाही तर यात वाढ होऊ शकते. एसटी आगारात १४८ चालक व १२६ वाहक असून, ४ क्लार्क, ४ कंट्रोलर, ४ लेखनिक, २२ वाहक कमी आहेत. त्यामुळे असणाऱ्या कर्मचाऱ्यांवर जादा कामाचा ताण येतो. आगारातील ६८ गाड्यांपैकी निम्म्यापेक्षा अधिक गाड्या खराब आहेत. वारंवार नादुरुस्त होतात. बसण्याची आसने खराब, काचा तुटलेल्या, सुखसुविधांचा अभाव, वेळेचे नियोजन नाही. यामुळे अनेकदा लहान-मोठे अपघात घडतात. गाड्या रस्त्यात बंद पडत असल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करतात. नवीन गाड्या देण्याबरोबरच कर्मचारी भरती करणे, प्रवाशांना वेळेवर गाड्या सोडणे, सुखसुविधा देणे याकडेही एसटी महामंडळाने लक्ष देण्याची खरी गरज आहे. मात्र, प्रशासनाच्या सावळा गोंधळामुळे भोर आगारातील एसटी सेवा कोलमडली आहे. 

Web Title: ST traveler!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.