कोरोना संसर्गामुळे एसटी, ट्रॅव्हल्सचा बुडतोय कोट्यावधींचा महसुल; ऐन हंगामात सेवा ठप्प
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 05:14 PM2020-04-24T17:14:47+5:302020-04-24T17:27:25+5:30
परीक्षा संपल्यानंतर मार्च-एप्रिल महिन्यात उन्हाळी सुट्टया सुरू होतात. त्यामुळे बाहेरगावी ये-जा करणाऱ्यांची एसटी व खासगी ट्रॅव्हल्सला गर्दी होते.
पुणे : उन्हाळी सुट्टया म्हणजे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) व खासगी ट्रॅव्हल्सच्या महसुलात अधिकची भर टाकणारा हंगाम. पण कोरोना संसर्गामुळे वाहतुक सेवा ठप्प असल्याने दररोज कोट्यावधी रुपयांच्या महसुलावर पाणी सोडावे लागत आहे. एसटी महामंडळाचे कर्मचारी-अधिकाऱ्यांना शासनाकडून वेतन मिळेलही पण खासगी ट्रॅव्हल्सच्या कर्मचाऱ्यांना मात्र आधार राहिलेला नाही.
शाळा-महाविद्यालयांच्या परीक्षा संपल्यानंतर मार्च-एप्रिल महिन्यात उन्हाळी सुट्टया सुरू होतात. त्यामुळे बाहेरगावी ये-जा करणाऱ्यांची एसटी व खासगी ट्रॅव्हल्सला गर्दी होते. पुण्यात राज्यासह परराज्यातून आलेल्यांची संख्या मोठी आहे. पश्चिम महाराष्ट्रासह खान्देश, विदर्भ, मराठवाड्यात जाण्यासाठी गर्दी होत असते. या सुट्यांमध्ये अनेकजण सहली, प्रवासाचे बेत आखतात. त्यानुसार एसटीसह खासगी ट्रॅव्हल्स मालकांकडूनही हंगामाचे नियोजन केले जाते. जादा बस सोडणे, विविध आकर्षक सवलती दिल्या जातात. पण यंदाचा हंगाम कोरोना संसर्गामुळे ठप्प झाला आहे. मागील एक महिन्यापासून एकही बस जागेवरून हलली नाही.
एसटीच्या पुणे विभागाकडून दर उन्हाळ्यात १५ एप्रिलनंतर जागा गाड्यांचे नियोजन केले जाते. नियमित गाड्यासह एकुण हजारावर गाड्या सोडण्यात येतात. तसेच बाहेरून पुण्यात येणाऱ्या जादा गाड्यांची संख्याही ४०० ते ५०० एवढी असते. हंगामाच्या काळात प्रवासी उत्पन्नात दररोज २५ ते ३० लाख वाढ होऊन सव्वा कोटीपर्यंत जाते, अशी माहिती विभागाच्या वाहतुक नियंत्रक यामिनी जोशी यांनी दिली.
--------------
पुण्यातून दररोज सरासरी १६०० बस ये-जा करतात. रोजचे प्रत्येक गाडीचे उत्पन्न सुमारे २० हजार एवढे असते. त्यानुसार दररोज ३ कोटींहून अधिक उलाढाल होत होती. पण सध्या सर्वच ठप्प आहे. एकीकडे महसुल मिळत नाही, तर दुसरीकडे बँका हप्त्यासाठी थांबत नाहीत. कर्मचाºयांना सध्या तात्पुरते पैसे दिले आहेत. पण पुढील महिन्यात कुठून पैसे देणार, हा प्रश्न आहे.
- प्रसन्न पटवर्धन, अध्यक्ष, बस ऑपरेटर कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया