...तर मागेल त्या ठिकाणाहून मिळणार एसटी; प्रवाशांना दिवाळीसाठी सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 02:17 PM2017-10-07T14:17:00+5:302017-10-07T14:20:32+5:30
दिवाळीच्या काळात संपूर्ण गाडी आरक्षित केल्यास मागेल त्या ठिकाणाहून बस सोडण्याची तयारी राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) दर्र्शविली आहे
पुणे : दिवाळीच्या काळात संपूर्ण गाडी आरक्षित केल्यास मागेल त्या ठिकाणाहून बस सोडण्याची तयारी राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) दर्र्शविली आहे. एसटीच्या अधिकृत एजंटांमार्फत देखील बस आरक्षित झाल्यास ही सुविधा देण्यात येणार आहे. यंदा उत्सवासाठी २ हजार ८०० जादा बसचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती राज्य परिवहन महामंडळाचे विभाग नियंत्रक श्रीनिवास जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
गेल्या वर्षी १२ सप्टेंबर ते १५ आॅक्टोबर या दिवाळीच्या काळात तब्बल २ लाख ९५ हजार प्रवाशांनी एसटीसेवेचा वापर केला होता. त्यावेळी अडीच हजार बसचे नियोजन करण्यात आले होते. यंदा दहा ते पंधरा टक्के प्रवाशांची वाढ लक्षात घेऊन जादा बस सोडण्यात येणार आहे. सणाच्या काळात सुरुवातीच्या बसस्थानकावरुनच बस भरुन निघते. त्यामुळे उपनगरातील प्रवाशांना भरलेली बसच पाहावी लागते. त्यांच्यासाठी यंदा विशेष बस सोडण्यात येतील. म्हणजे स्वारगेटहून सुटणारी बस हडपसरपर्यंत मोकळी जाईल. तेथूनच प्रवासी घेतले जातील. त्यामुळे उपनगरातील प्रवाशांना शहरातील बसस्थानक गाठावे लागणार नाही. येत्या सात दिवसांत त्याचा आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे जोशी यांनी सांगितले.
आरक्षणासाठी ५८४ बस उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. एसटीचे शहरात २४ अधिकृत विक्री केंद्र आहे. या ठिकाणाहून देखील नागरिकांना तिकीट आरक्षित करण्यात येणार आहे. एखाद्या एजंटकडून विशिष्ट मार्गावरील संपूर्ण बस आरक्षित झाल्यास, त्याच भागातून ती सोडण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. शिवाजीनगर येथील शासकीय अभियांत्रिकी मैदानातून ४८४ बसचे नियोजन करण्यात आले आहे. स्वारगेटमधून ९४२, शिवाजीनगर ९४८, पिंपरी-चिंचवड २८४ अशा २ हजार ६५८ बस सोडण्यात येतील. तसेच, गरजेनुसार त्यातही वाढ करण्यात येणार आहे.
जादा बसचे असे असेल नियोजन
शिवाजीनगर : १४ ते १८ आॅक्टोबर दरम्यान नाशिक, औरंगाबाद जिल्हा
शासकीय इंजिनिअरींग महाविद्यालय , शिवाजीनगर (१४ ते १८ आॅक्टोबर) : नागपूर, अकोला, अमरावती, अंबड, अहमदपूर, अंबाजोगाई, बीड, औसा, सिल्लोड, चोपडा, धुळे, हिंगोली, जाफराबाद, जालना, कळंब, मलकापूर, लातूर, मेहकर, जामनेर, जळगाव, नांदेड, उस्मानाबाद, परळी, परभणी, परतूर, पुसद, शेगाव, तुळजापूर, उदगीर, उमरगा, वाशीम, यावल, सवतमाळ, बुलढाणा.