ST प्रवाशांच्या समस्या सोडवणार; पुणे विभागातील १४ आगारात प्रवासी दिन साजरा होणार
By अजित घस्ते | Published: July 11, 2024 07:04 PM2024-07-11T19:04:05+5:302024-07-11T19:04:23+5:30
एसटी बस स्वच्छ व वेळापत्रकानुसार वेळेत मार्गस्थ व्हाव्यात, ठरलेले थांबे घ्यावेत, चालक-वाहक यांनी त्यांच्याशी सौजन्याने वागावे अशी प्रवाशांची अपेक्षा असते
पुणे: प्रवाशांच्या तक्रारी, समस्या आणि सूचनांचे तात्काळ निराकारण करण्यासाठी प्रत्येक आगारामध्ये आठड्याच्या सोमवारी आणि शुक्रवारी प्रवासी राजा दिन साजरा करण्यात येणार आहे. त्यानुसार पुणे विभागात येत्या दि. १५ जुलै पासून हा प्रवासी दिन साजरा करण्यात येणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक प्रमोद नेहूल यांनी दिली.
राज्य परिवहन महामंडळ (एसटी) च्या विविध बसमधून सरासरी ५४ लाख प्रवाशांना सुरक्षित सेवा दिली जाते. त्यासाठी एसटीचे ९० हजार पेक्षा अधिक कर्मचारी अहोरात्र काम करतात. प्रवाशांना एसटी बसस्थानक, बसस्थानकांवरील प्रसाधनगृहे स्वच्छ, निर्जंतुक आणि टापटीप असावीत. तसेच सर्व एसटी बस स्वच्छ व वेळापत्रकानुसार वेळेत मार्गस्थ व्हाव्यात, ठरलेले थांबे घ्यावेत, चालक-वाहक यांनी त्यांच्याशी सौजन्याने वागावे अशी किमान अपेक्षा प्रवाशांकडून असते.
प्रवाशांनी केलेल्या तक्रारींची तात्काळ दखल घेऊन प्रवासी सेवेचा दर्जा आणि गुणवत्ता सुधारण्यासाठी समस्या आणि तक्रारींचे वेळीच निराकरण होणे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी हा प्रवाशी दिन आयोजीत केला असून, आठवड्याच्या प्रत्येक सोमवारी आणि शुक्रवारी संबंधित आगारात सकाळी १० ते २ या वेळेत प्रवाशी, प्रवाशी संघटना, शाळा-महाविद्यालये यांनी त्यांच्या लेखी सूचना, तक्रारी मांडू शकतात. त्यावर मध्यवर्ती कार्यालय लक्ष ठेवणार असून तातडीने कार्यवाही करण्यात येईल, असे अश्वासनही विभाग नियंत्रक कार्यालयाकडून देण्यात आले.
कोणत्या आगारात कधी होणार प्रवाशी दिन साजरा असे आहे वेळापत्रक
इंदापूर (दि. 15 जुलै), तळेगांव - (दि. 19 जुलै), राजगुरूनगर (दि. 22 जुलै), पिंपरी-चिंचवड - (दि. 26 जुलै), मंचर (दि. 29 जुलै), शिवाजीनगर - (दि. 2 ऑगस्ट), शिरूर - (दि. 5 ऑगस्ट), भोर - (दि. 9 ऑगस्ट), दौंड - (दि. 12 ऑगस्ट), स्वारगेट (दि. 16 ऑगस्ट), नारायणगांव (दि. 19 ऑगस्ट), बारामती शहर आणि बारामती एमआयडीसी (दि. 23 ऑगस्ट), सासवड - (दि. 26 ऑगस्ट)