रस्ता उखडल्याने एसटी होणार बंद
By Admin | Published: June 27, 2017 07:43 AM2017-06-27T07:43:58+5:302017-06-27T07:43:58+5:30
कडूस-राजगुरुनगर रस्त्यालगतच्या आगरमाथा- रानमळा या चौदा वर्षांपूर्वीच्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. रस्त्याचे मजबुतीकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
कडूस : कडूस-राजगुरुनगर रस्त्यालगतच्या आगरमाथा- रानमळा या चौदा वर्षांपूर्वीच्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. रस्त्याचे मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी रानमळा ग्रामस्थांनी विद्यमान आमदार सुरेश गोरे यांच्याकडे मागणी केलेली आहे.
रानमळा-आगरमाथा दोन किलोमीटरचा रस्ता दुरुस्तीअभावी लहान-मोठ्या खड्ड्याच्या चाळणीने पूर्णपणे उखडला आहे. या लहान गावात दवाखाना, हायस्कूल, कॉलेज नसल्याने संबंधितांना लगतच्या दोंदे, राजगुरुनगर या गावी जावे लागते. या गावाला दिवसातून तीन वेळा एसटीच्या फेऱ्या होतात. रस्ता पूर्णपणे उखडला असल्याने तसेच अरुंद असल्याने राजगुरुनगर आगर स्थानकाने एसटी सेवा बंद करण्याची ग्रामपंचायतीला सूचना दिली आहे. त्यामुळे शाळा, कॉलेजचे विद्यार्थी, आजारी लोक व ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.
नुकत्याच झालेल्या पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मान्यवरांनी उद्घाटन केलेले आहे. पण या कामाचे पुढे काय झाले, याबाबत ग्रामस्थ संभ्रमात आहेत. पर्यावरण दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात आमदार सुरेश गोरे यांनी एक किलोमीटर रस्त्यासाठी २0 लाखांची तरतूद केल्याचे तसेच उर्वरित दुसऱ्या किलोमीटरसाठी आगामी बजेटमध्ये दुरुस्ती करण्याचे आश्वासन दिलेले आहे. उद्घाटने व आश्वासनांच्या पूर्ततेकडे रानमळा ग्रामस्थांचे लक्ष लागलेले आहे.