एसटी कार्यशाळेतील बसबांधणीचे काम थंडावले

By admin | Published: December 26, 2016 03:24 AM2016-12-26T03:24:58+5:302016-12-26T03:24:58+5:30

एकेकाळी बसबांधणी क्षेत्रात नावलौकिक मिळविलेल्या दापोडी एसटी कार्यशाळेतील काम सद्य:स्थितीत थंडावले आहे.

ST workshop stopped the construction of buses | एसटी कार्यशाळेतील बसबांधणीचे काम थंडावले

एसटी कार्यशाळेतील बसबांधणीचे काम थंडावले

Next

संजय माने / पिंपरी
एकेकाळी बसबांधणी क्षेत्रात नावलौकिक मिळविलेल्या दापोडी एसटी कार्यशाळेतील काम सद्य:स्थितीत थंडावले आहे. महापालिकांच्या परिवहन समित्यांकडून बस खरेदीचे प्रमाण कमी झाले आहे. एसटीच्या ताफ्यातील बसगाड्यांची संख्याही घटली आहे. परिणामी राज्य परिवहन महामंडळाच्या दापोडी येथील मध्यवर्ती कार्यशाळेतील बसबांधणीचे काम थंडावले आहे.
दर्जेदार बसबांधणीसाठी अग्रेसर असलेल्या दापोडीतील मध्यवर्ती कार्यशाळेला ६५ वर्षे झाली. १९५१ मध्ये दापोडीतील २६ एकर जागेवर पीडब्ल्यूडी वर्कशॉपलगत ही कार्यशाळा साकारली. नव्या चॅसिजवर बसची बांधणी करणे, राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यातील राज्यभर धावणाऱ्या बसगाड्यांची काही वर्षांनी पुनर्बांधणी करणे, टायर रीमोल्डिंग अशा स्वरूपाची कामे या कार्यशाळेत केली जात आहेत. अत्यंत मजबूत आणि टिकाऊ बसबांधणी हे या कार्यशाळचे वैशिष्ट्य मानले जात असल्याने दुसऱ्या राज्यातील परिवहन खात्याच्या सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या बसगाड्या दापोडी कार्यशाळेत पाठविल्या जात होत्या.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसबांधणीकरिता स्थापन झालेली ही कार्यशाळा उच्च दर्जाच्या बसबांधणीसाठी इतर राज्यांसाठीही महत्त्वाची ठरली. गोवा, मध्यप्रदेश, कर्नाटक, गुजरात, आंध्रप्रदेश या राज्यांतील बससुद्धा बांधणीसाठी दापोडीतील कार्यशाळेत पाठवल्या जायच्या. एवढेच नव्हे, तर लष्कारासाठी आवश्यक असणाऱ्या बसगाड्यांची कार्यशाळेतील सुमारे साडेतीन हजार कामगारांना हे काम उरकत नव्हते. कामाचा व्याप वाढल्याने औरंगाबाद, नागपूर येथे कार्यशाळा सुरू कराव्या लागल्या. परिवहन महामंडळाच्या वतीने दापोडीसह अन्य दोन कार्यशाळा सुरू झाल्या. त्या ठिकाणीही बसबांधणीचे काम केले जात आहे. परंतु औरंगाबाद, नागपूर येथील कार्यशाळांच्या तुलनेत कार्यशाळेत बस बांधणीचे काम मोठ्या स्वरूपात केले जात होते. प्रतिदिन या वर्कशॉपमधून एक बस तयार होत असे. आता केवळ जुन्या बस पुनर्बांधणीसाठी या कार्यशाळेत येतात. सद्य:स्थितीत दापोडीतील कार्यशाळेत काम करणाऱ्या कामगारांची संख्या ७०० आहे.
कामगारांचे मुख्यमंत्र्यांना साकडे
४दापोडी एस टी कार्यशाळेतील बसबांधणीचे काम कमी झाल्याने कामगार विवंचनेत आहेत. पूर्वीच्या तुलनेत विविध परिवहन संस्थांचे बस खरेदीचे प्रमाण कमी झाले असून, त्याचा परिणाम एसटी कार्यशाळेच्या कामावर होत आहे. एसटीचे खासगीकरण करण्यासंदर्भातील हालचाली सुरू असल्याच्या वार्ता कानावर पडू लागल्याने कामगार चिंता व्यक्त करू लागले आहेत. कामगारांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले असून, एसटी आणि कार्यशाळेचे अस्तित्व अबाधित राखले जावे,
यासाठी थेट मुख्यमंत्र्यांना साकडे घातले आहे.
कामगारांमध्ये चिंतेचे वातावरण
४एशियाड (निमआराम), डीलक्स या प्रवाशांच्या सेवेसाठी रस्त्यावर धावणाऱ्या आलिशान,आरामदायी बसगाड्या याच वर्कशॉपमध्ये तयार झाल्या. राज्य परिवहन महामंडळाची ही मध्यवर्ती कार्यशाळा असल्याने बसबांधणी कामात दर्जाबाबत कसलीही तडजोड केली जात नव्हती. त्यामुळे बसखरेदीस विलंब झाला, तरी जुन्या बस अधिक काळ रस्त्यावर धावतील अशा पद्धतीचे उत्कृष्ट काम या वर्कशॉपमध्ये झाले. अलीकडच्या काळात काम कमी झाल्याने कामगार वर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title: ST workshop stopped the construction of buses

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.